अपार्टमेंटसमोर एक धामण जातीचा सर्प येऊन थांबल्यामुळे एकच तारांबळ बुडाल्याची घटना गणेश रेसिडेन्सी हिंदूनगर, टिळकवाडी येथे अलीकडेच घडली तथापि सर्पमित्र आनंद चिट्टी यांची शिष्या पी. ज्योदी हिने त्या सर्पाला शिताफीने पकडल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
याबाबतची थोडक्यात माहिती अशी की अलीकडे काही दिवसापूर्वी गणेश रेसिडेन्सी हिंदूनगर, टिळकवाडी येथील वसंत अणवेकर यांच्या अपार्टमेंटसमोर एक धामण सर्प येऊन थांबल्याने सर्वांची तारांबळ उडाली.
सदर सर्पाला पकडण्यासाठी सर्पमित्र आनंद चिट्टी याना पाचारण करण्यात आले. सर्पमित्र चिट्टी यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेऊन त्या सर्पाला पकडण्याची जबाबदारी आपल्याकडे प्रशिक्षण घेत असलेल्या साताऱ्याच्या पी. ज्योदी या मुलीवर सोपविली.
ती सर्प पकडण्याचा प्रयत्न करत असताना खवळलेल्या धामणने ज्योदिवर हल्ला चढवून वेगाने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला.
तेंव्हा पी. ज्योदी हिने चपळाईने पळणाऱ्या धामणचा पाठलाग करून मोठ्या शिताफीने त्याला पकडले. यावेळी बघ्यांची गर्दी झाली होती. सापाला पकडण्यात येताच उपस्थित सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.