Wednesday, December 25, 2024

/

अन् आता अवघ्या 6 तासांत गाठा दुबई : सुरु झाली स्पाईस जेट विमानसेवा

 belgaum

आपल्या हवाई संपर्क क्षेत्राला नवी चालना देताना बेळगाव विमानतळाने आपल्या हवाई मार्गांमध्ये आता आणखी एका नव्या मार्गाची भर घातली आहे. स्पाईस जेट विमान कंपनीने मुंबईमार्गे बेळगाव ते दुबई अशी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू केली आहे.

स्पाईस जेट विमान (एसजी -3745) बेळगाव येथून सायंकाळी 7:30 वाजता निघेल आणि मुंबई विमानतळावर रात्री 9:25 वाजता उतरेल. मुंबई येथे 2 तास 5 मिनिटाचा थांबा असणार आहे. या कालावधी प्रवाशांना विमान बदलावे लागेल. मुंबई येथे प्रवाशांना आपले सामान उचलून नव्या काउंटरवर सुपूर्द करण्याचे किंवा दुसरा बोर्डिंग पास घेण्याचे कष्ट घ्यावे लागणार नाहीत. कारण त्यांना बेळगाव विमानतळावरच बेळगाव ते दुबई बोर्डिंग पास दिला जाणार आहे. त्यांचे प्रवासाचे सामान देखील कोणत्याही अडचणी विना परस्पर एका विमानातून दुसऱ्या विमानात हलविले जाईल. मुंबई येथे प्रवाशांसाठी दुबईला जाणारे विमान ( एसजी -173) तयार असेल जे रात्री 11:30 वाजता उड्डाण करून मध्यरात्री 1:10 वाजता दुबई येथे पोहोचेल.

बेळगाव -दुबई विमान सेवा ही परतीच्या प्रवासाचा कोणताही दुसरा पर्याय नसणारी “वनवे फ्लाईट” असणार आहे. ही विमानसेवा आठवड्यातील दोन दिवस म्हणजे बुधवारी आणि शुक्रवारी उपलब्ध असणार आहे. मुंबई येथील सुमारे दोन तासाच्या थांब्यादरम्यान प्रवाशांना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर फेरफटका मारण्यासाठी आणि देशान्तर व कस्टम संदर्भातील कागदपत्रांची पूर्तता करण्यास पुरेसा वेळ मिळणार आहे. बेळगाव -दुबई प्रवासाचे भाडे कोणते तिकीट खरेदी करणार त्यावर अवलंबून असणार आहे. हे प्रवासभाडे कर व इतर शुल्क वगळता 8,500 रुपयांपासून सुरू होते.

आजतागायत उत्तर कर्नाटकातून दुबई आणि मध्यपूर्व देशांना जाण्यासाठी थेट विमानसेवा उपलब्ध नव्हती. त्यामुळे प्रवाशांना संबंधित इच्छित स्थळी जाण्यासाठी बराच त्रास व दगदग सहन करावी लागत होती. यासाठी प्रवाशांना गोवा किंवा बेंगलोरला जाऊन विमान पकडावे लागत होते. तथापि आता स्पाईस जेटने सायंकाळची विमानसेवा सुरू केल्यामुळे दोन तासाचा थांबा वगळता प्रवाशांना विनासायास अवघ्या 6 तासात बेळगावहून दुबई गाठता येणार असल्याचे बेळगावचे कृष्णा गिरीयण्णावर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.