जलसंपदामंत्री रमेश जारकीहोळी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची टोपी घातलेली मी कधी पाहिली नाही. त्यांनी मुस्लिम टोपी घातली आहे. त्यांचे तसे अनेक फोटो आमच्याकडे आहेत असे सांगून मुस्लिम टोपी घातलेला फोटो दाखवत कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी आपल्या सख्ख्या भावाचे पितळ उघडे पाडले.
बेळगावात पत्रकारांशी बोलताना आमदार सतीश जारकीहोळी म्हणाले की, आमचे कुटुंब संघ परिवारामध्ये कधीही गेलेले नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) आमच्या कुटुंबाचा काडीचाही संबंध नव्हता.
रमेश जारकीहोळी रा. स्व. संघामध्ये कधी होते मला माहीत नाही. मात्र ते मुस्लीम धर्मीयांच्या बाजूने होते हे मात्र मला पक्के माहीत आहे.
गोकाकमधील पत्रावळी कुटुंब हे मूळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर समर्थक व अनुयायी आहेत. त्यांचे सोन्याचे दुकान होते आणि त्या दुकानात आमचे वडील जात होते. गोवा मुक्ती लढ्याशी आमचा आणि आरएसएसचा कांही संबंध नाही. उगाच ते मिरवत असतात, असेही आमदार सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.