Tuesday, January 7, 2025

/

समिती नेत्यांनो…! ही वेळ येण्यापासून वेळीच रोखा!

 belgaum

सीमाभागातील मराठी भाषिक जनतेवर या ना त्या कारणाने नेहमीच अन्याय आणि दडपशाहीचे प्रकार होत असतात. मराठी जनतेला न्याय्य हक्कापासून नेहमीच वंचित रहावे लागले आहे. गेल्या काही वर्षांपासून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये फूट पडली असून मराठी भाषिक जनतेला कोणीही वाली नसल्याचे चित्र सीमाभागात दिसून येत आहे. सध्या महाराष्ट्र एकीकरण युवा समिती जोरदार कार्यरत असून इतर समित्या मात्र अजूनही गटातटाच्या राजकारणात गुरफटल्या आहेत. आणि पर्यायाने सीमाभागातील मराठी भाषिकांनाही गुरफटवत आहेत.

मागील आठवड्यात महानगरपालिकेसमोर काही तथाकथित कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लाल – पिवळा ध्वज फडकविला. या ध्वजावरून सीमाभागातील वातावरण तापले असून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने या विरोधात आवाज उठविला आहे. हा ध्वज हटविण्यासाठी प्रशासनाकडे मागणी उचलून धरली आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांच्यासमवेत युवा समितीने चर्चा केली आहे. याप्रश्नी तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने वेळ मागितला असून जिल्हाधिकारी, पालकमंत्री आणि पोलीस प्रशासन यांच्या समन्वयाने चर्चा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर सोमवार दि. ४ जानेवारी रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

सध्या सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीचा कोणताही नेता खंबीरपणे नेतृत्व झेलण्यास असमर्थ आहे. चारी दिशेला चार चेहरे असणाऱ्या नेत्यांमुळे सीमाभागातील मराठी जनता भरकटली आहे. आणि प्रशासकीय दडपशाहीखाली भरडली जात आहे. अशावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व नेत्यांनी जाणीवपूर्वक विचार करून मराठी भाषिक जनतेसाठी योग्य नेतृत्व तयार करणे काळाची गरज आहे. मध्यवर्ती मध्ये असणारे अनेक पदाधिकारी, सदस्य हे वरचेवर अनुपस्थित असतात. अनेक सदस्य राष्ट्रीय पक्षाकडे वळले आहेत. त्यामुळे आता सर्व घटक समित्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा मध्यवर्ती आणि घटक समित्यांची पुनर्रचना करावी, अशी मागणी तमाम मराठी भाषिक जनता करीत आहे. या पुनर्रचनेत युवकांना प्राधान्य देऊन ज्येष्ठांनी मार्गदर्शन करावे, अशी मागणी वारंवार होताना दिसत आहे.

मध्यवर्ती, शहर, तालुका आणि इतर सर्व घटक समित्या एकत्रित करून, एकमताने आणि संपूर्ण सीमाभागात एकाच गटाने समितीची पुनर्रचना होणे आवश्यक आहे. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मराठी जनतेने स्वतः पुढाकार घेऊन बहुतांशी ग्रामपंचायतींवर मराठी झेंडा रोवला आहे. कोणत्याही नेतृत्वाशिवाय स्वबळावर निवडणूक लढवून मराठीचे वर्चस्व प्रस्थापित केले आहे. परंतु महाराष्ट्र एकीकरण समितीची नेमकी दिशा ठरत नसल्यामुळे अनेक मराठी कार्यकर्ते राष्ट्रीय पक्षाकडे वळत आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल, मराठी भाषिकांचा जोश आणि महाराष्ट्र एकीकरण समिती या साऱ्यांचा ताळमेळ बिघडला आहे. सीमाभागातील सक्रिय होणारे राष्टीय पक्ष आणि त्यासोबत मराठी भाषिकांची राष्ट्रीय पक्षांकडे वळणारी पाऊले अशा परिस्थितीत ‘तेलही गेले, तूपही गेले….’ अशी परिस्थिती निर्माण होण्याआधी सर्व मरगळ झटकून, मतभेद आणि गट – तट बाजूला सारून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीसह सर्व घटक समित्यांची पुनर्रचना होणे आवश्यक आहे त्यात हक्क आणि महत्वाच्या जबाबदाऱ्या युवकांकडे देणे गरजेचे आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.