दिल्ली येथे सुरु असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी देशभरातील अनेक ठिकाणाहून ट्रॅक्टर रॅली साठी सज्ज असलेले शेतकरी यासोबतच बेळगावमधील शेतकऱ्यांनीही रॅली काढण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली आपल्यासाठी खूप दूर आहे. तिथे जाणे सध्या शक्य नाही. त्यामुळे बेळगावमध्येच तब्बल ३०० हुन अधिक ट्रॅक्टर घेऊन भव्य रॅली काढून प्रजासत्ताकदिनी ट्रॅक्टर परेड होणार असल्याची माहिती शेतकरी नेते आणि माजी केंद्रीय मंत्री बाबागौडा पाटील यांनी दिली आहे.
केंद्र सरकारने अंमलात आणलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये ट्रॅक्टर परेडचे आयोजन करण्यात आले आहे. केवळ दिल्लीतच नाही तर बेळगावमध्येही परेड होईल, अशी प्रतिक्रिया बाबागौडा पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
आमच्यासाठी दिल्ली खूप दूर आहे, यामुळे आम्ही बेळगावमध्येच आंदोलन करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार न करता हा कायदा अंमलात आणला आहे. याविरोधात केवळ दिल्लीतच नाही तर बेळगावमध्येही जोरदार विरोध होत आहे. हि समस्या केवळ पंजाब मधील शेतकऱ्यांचीच नाही तर संपूर्ण देशातील शेतकऱ्यांची आहे. दिल्ली येथे सध्या जाणे शक्य नसल्याने आम्ही बेळगावमध्ये भव्य आंदोलन छेडणार आहोत. प्रजासत्ताकदिनी ३०० हुन अधिक ट्रॅक्टरचा समावेश असलेली भव्य ट्रॅक्टर रॅली काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गांधीनगरपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हि रॅली निघणार आहे. रॅलीनंतर सरदार मैदानावर निषेध सभेचे आयोजन करण्यात आले आहे. हे आंदोलन केवळ पक्षापुरते मर्यादित नसून या रॅलीसाठी पोलीस विभागाची परवानगी घेण्यात आली आहे. आणि उद्या केवळ एकाच दिवस विरोध करण्यासाठी हि रॅली काढण्यात येणार नसून जोवर केंद्रसरकार हा कायदा मागे घेत नाही, तोपर्यंत अशी आंदोलने करण्यात येतील, असेही ते म्हणाले.