कोरोना प्रादुर्भावामुळे भक्तांच्या आरोग्याच्या हितार्थ जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून सौंदत्ती (जि. बेळगाव) तालुक्यातील श्रीक्षेत्र यल्लमा देवस्थान येत्या दि. 22 जानेवारीपासून दि. 9 फेब्रुवारी 2021 पर्यंत पुजाविधी आणि दर्शनासाठी बंद असणार आहे.
श्रीक्षेत्र यल्लमा देवस्थानाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे तसे जाहीर केले आहे. एकीकडे राजकीय सभा -मिरवणूकांना परवानगी दिली जात असताना दुसरीकडे देवदर्शनावर अशी बंदी घालण्यात आल्यामुळे भाविकांत तीव्र नापसंती व्यक्त होत आहे.
सौंदत्ती (जि. बेळगाव) येथील श्रीक्षेत्र यल्लमा देवस्थानाला भेट देणाऱ्या श्री रेणुका यल्लमा देवीच्या भक्तांचे आरोग्य कोरोना प्रादुर्भाव काळात सुरक्षित राहावे यासाठी येत्या दि. 22 जानेवारी ते दि. 9 फेब्रुवारी 2021 पर्यंत सदर श्री यल्लम्मा देवस्थान भाविकांना दर्शनासाठी बंद असणार आहे. याठिकाणी येत्या 28 जानेवारी रोजी होणारा यात्रोत्सव देखील रद्द करण्यात आला आहे. तेंव्हा उपरोक्त कालावधीमध्ये भक्तांनी आपापल्या घरी देवीची पूजाअर्चा आणि संबंधित धार्मिक विधी करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या काल झालेल्या बेळगाव दौऱ्यानिमित्त आयोजित सभा आणि रोड शोला बिनबोभाट परवानगी देणाऱ्या प्रशासनाला त्यावेळी कोरोना प्रादुर्भाव आठवला नाही का? असा संतप्त सवाल भाविकांकडून केला जात आहे. राजकीय पक्षाच्या या कार्यक्रमांमध्ये लाखोच्या संख्येने लोक सहभागी झाले होते.
रोड शोमधील बहुसंख्य स्त्री-पुरुष कार्यकर्त्यांच्या तोंडावर मास्कही दिसत नव्हते. प्रचंड गर्दी झाली की हा प्रकार होणार हे माहीत असूनही या कार्यक्रमांना निमूटपणे परवानगी देण्यात आली होती. या राजकीय कार्यक्रमांच्या तुलनेत देवस्थानांमध्ये देव दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या फारच कमी असते. शिवाय सर्व भाविक आज-काल कटाक्षाने मास्कचा वापर करतात. मात्र तरीदेखील यात्रा रद्द करून श्री यल्लमा देवी दर्शनावर बंदी घालण्यात आल्यामुळे श्री रेणुका यल्लमा भक्तांमध्ये तीव्र नापसंती व्यक्त होत आहे.