नैऋत्य रेल्वेच्या बेंगलोर येथील रेलसौध या मुख्यालयामध्ये खासदार (राज्यसभा) इराण्णा कडाडी यांनी नैऋत्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अजयकुमार सिंग आणि संबंधित अन्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन बेळगाव मतदारसंघाशी संबंधित रेल्वे मुद्द्यांवर चर्चा केली.
खासदार कडाडी यांच्या उपस्थितीत रेलसौध येथे झालेल्या बैठकीप्रसंगी नैऋत्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांसह हुबळीचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक अरविंद मालखेडे, पीसीसीएम अनिल पवित्रण, सीपीटीएम एच. एम. दिनेश, सीई /सीएन टी. व्ही. भूषण, डीजीएम /सीपीआरओ श्रीमती ई. विजया आणि एजीएम /आरव्हीएनएल अरुण जी. पाटील हे उपस्थित होते. यावेळी खासदार इराण्णा कडाडी यांनी बेळगाव रेल्वे स्थानकाच्या विकास कामाच्या प्रगतीची आणि बेळगाव येथे होणाऱ्या रेल्वे कोचिंग डेपोबाबत चौकशी केली.
यावेळी बोलताना महाव्यवस्थापक अजयकुमार सिंग यांनी बेळगाव रेल्वेस्थानकाची इमारत तीन वेगवेगळ्या भागात (ब्लॉक) बांधली जाणार असून तीन पैकी बाजूला असणाऱ्या दोन इमारतींच्या मजल्यांचे स्लॅब आणि दगडी बांधकाम पूर्ण झाल्याचे तसेच अंतिम टप्प्यातील काम सुरू असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे मध्यभागी असलेल्या इमारतीचे काम अद्याप सुरू आहे. या इमारतीच्या पहिल्या मजल्याचा स्लॅब गेल्या नोव्हेंबर 2020मध्ये घालण्यात आला आहे. उर्वरित दुसऱ्या व तिसऱ्या मजल्याचा स्लॅब अनुक्रमे येत्या जानेवारी आणि फेब्रुवारी 2021 मध्ये घातला जाणार असल्याची माहिती सिंग यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार बेळगाव येथील रेल्वे कोचिंग डेपोचे काम येत्या एप्रिल 2021 मध्ये पूर्ण होणार आहे. लोंढा मिरज दुपदरी रेल्वेमार्ग संदर्भात बोलताना रायबाग -चिंचली -कुडची हा नवा रेल्वेमार्ग मार्च 2021 मध्ये सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण लोंढा -मिरज दुपदरी रेल्वे मार्ग 2023 मध्ये कार्यान्वित होणार आहे. या मार्गावरील खानापूर, देसुर, इदलहोंडा, घटप्रभा, चिक्कोडी रोड आणि चिंचली रेल्वेस्थानकाच्या इमारती नव्याने बांधण्यात आल्या आहेत. गुंजी, सांबरा, सुळेभावी, रायबाग व कुडची या रेल्वेस्थानकाच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्याचप्रमाणे सुळधाळ, पाच्छापूर, गोकाक रोड व शेडबाळ रेल्वे स्थानकावरील नव्या इमारतींचे बांधकाम लवकरच हाती घेतले जाणार आहे.
टिळकवाडी, बेळगाव येथील तिसऱ्या रेल्वे गेट रेल्वे ओव्हर ब्रिज संदर्भात खासदार इराण्णा कडाडी यांनी चौकशी केली असता. ब्रिजवरील पहिल्या दोन मार्गांचे काम सुरू असून ते एप्रिल 2021 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या दोन मार्गांचे काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित दोन मार्गांचे बांधकाम हाती घेतले जाणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी कमी अंतराच्या पॅसेंजर रेल्वे पूर्ववत सुरू करण्याबाबत देखील खासदार कडाडी यांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा केली.