तथाकथित कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी गेल्या शनिवारी (9 जाने.) येळ्ळूर राजहंस गडावर जो धिंगाणा घातला होता. त्याच्या निषेधार्थ आज सकाळी येळ्ळूर आणि परिसरातील शिवदुर्ग प्रेमी भव्य निषेध रॅली काढणार होते. मात्र गडाकडे जाणारे सर्व रस्ते रोखून धरणाऱ्या पोलिसांनी विनंती केल्यामुळे ही रॅली तुर्तास रद्द करण्यात आली आहे.
कांही दिवसांपूर्वी येळ्ळूर येथील राजहंसगडावर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांना युवा शिवदुर्ग प्रेमींनी चोप दिला होता. त्यानंतर आता गेल्या शनिवारी 9 जानेवारी रोजी कांही तथाकथित कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी राजहंस गडावर धिंगाणा घालण्याचा प्रकार केला. हा निंद्य प्रकार करून प्रकरणाला वेगळे वळण देण्याद्वारे तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला.
या कृतीचा येळ्ळूर येथील आजी-माजी लोकप्रतिनिधी, युवक आणि येळूरवासियांनी तीव्र धिक्कार केला. तसेच याच्या निषेधार्थ आज गावातील शिवसेना चौकातून राजहंस गडावर भव्य निषेध रॅली काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज सकाळी शेकडो युवक शिवसेना फलकानजीक जमा झाले होते. मात्र भल्या पहाटेपासूनच येळ्ळूर गावात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
निषेध रॅली काढण्याच्या तयारीत असलेल्या युवकांना पोलिसांनी गावाच्या वेशीतच अडविले. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बेळगाव दौऱ्यावर येत असल्यामुळे आधीच आमच्यावर ताण आहे. तेंव्हा त्यामध्ये तुम्ही आणखी भर घालू नका. कृपया निषेध रॅली काढू नका.
त्याऐवजी घडल्या घटनेच्या विरोधात वडगाव पोलिस स्थानकात तक्रार करा किंवा निवेदन देऊन संबंधितांवर कारवाई करण्याचे आणि असा प्रकार पुन्हा खपवून घेतला नाही जाणार नाही अशा आशयाचे निवेदन द्या. आम्ही देखील कन्नड कार्यकर्त्यांनी जो प्रकार केला तसा प्रकार गडावर पुन्हा घडणार नाही याची जबाबदारी घेत आहोत. तेंव्हा कृपया रॅली काढू नका, अशी विनंती बंदोबस्तास असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी केली.
या विनंतीला मान देऊन उपस्थित दुर्गप्रेमी युवकांनी निषेध रॅलीचे आपले आंदोलन तूर्तास स्थगित केले. येळ्ळूर आणि परिसरातील शिव दुर्गप्रेमीकडून निषेध रॅलीच्या स्वरूपात आंदोलन केले जाऊ नये यासाठी आज राजहंस गडाकडे जाणारे सर्व रस्ते पोलिसांनी अडविले होते.