बेळगाव शहापूर येथील गजाननराव भातकांडे हायस्कूल समोरील रस्ता अवजड वाहनांच्या रहदारीमुळे दिवसेंदिवस धोकादायक बनत चालला आहे. या ठिकाणच्या खड्ड्यात एक ट्रक अडकून पडल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली.
गजाननराव भातकांडे हायस्कूलनजीकच्या रस्त्यावर गेल्या कांही दिवसांपासून पाईपलाईन घालण्याचे काम सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात येण्याआधीच हा रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आला आहे परिणामी शुक्रवारी रात्री एक ट्रक खड्ड्यामध्ये अडकून पडला.
सदर ट्रक खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते. सकाळच्या वेळी मोठी वर्दळ असणाऱ्या या रस्त्याला दोन महत्त्वाचे रस्ते जोडले गेले आहेत. ते म्हणजे पुर्वेला जुना धारवाड रोड तर पश्चिमेला गोवा -खानापूर रोड.
या दोन्ही रस्त्यांवरील अवजड वाहने शॉर्टकट पडत असल्यामुळे भातकांडे हायस्कूल समोरील रस्त्याचा वापर करतात त्यामुळे या रस्त्यावर अवजड वाहनांची वर्दळ दिवस-रात्र सुरू असते.
केवळ स्थानिक लोकांच्या रहदारीसाठी असणाऱ्या या रस्त्यावर अशाप्रकारे अवजड वाहने करत असल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. कारण नागरिकांबरोबरच या रस्त्यावर शाळेला जाणाऱ्या मुला-मुलींची वर्दळ असते. अवजड वाहनांमुळे मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले असते. तेंव्हा या मार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंदी करावी अशी जोरदार मागणी केली जात आहे.