स्मार्ट सिटी बरोबरच बेळगावचे हेस्काॅम कार्यालय देखील स्मार्ट होत असून विजेच्या तक्रारीबाबत नेहरूनगर येथील हेस्काॅम कार्यालयांमध्ये नवे मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे. ज्यामुळे आता ग्राहकांना घरबसल्या तक्रार करता येणार आहे.
नेहरूनगर येथील हेस्काॅम कार्यालयामध्ये विजेच्या तक्रारीसंदर्भात मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे. प्रारंभी त्याची प्रात्यक्षिके होणार असून त्यानंतर हे ॲप ग्राहकांसाठी उपलब्ध केले जाणार आहे. हे ॲप विकसित करण्यासाठी कार्यालयातील सॉफ्टवेअर अभियंत्यांनी परिश्रम घेतले आहेत. या पद्धतीचे ॲप प्रथम विकसित करण्याचा मान नेहरूनगर येथील हेस्काॅम कार्यालयाला मिळणार आहे.
सदर ॲपमध्ये ग्राहकांचा आर. आर. नंबर व मोबाईल नंबर नोंद केला जाणार असून त्यानंतर हेस्काॅमचे हे ॲप स्मार्ट फोनवर डाऊनलोड करून घ्यावे लागणार आहे. या ॲपमध्ये 12 प्रकारच्या तक्रारी नमूद आहेत. ग्राहकाने ॲपच्या माध्यमातून तक्रार दाखल केल्यानंतर ती तक्रार त्या भागात कार्यरत असलेल्या लाईनमनच्या मोबाईलवर जाईल. दिवसभरात किती तक्रारी दाखल झाल्या व त्या कोणकोणत्या लाईनमनकडे वर्ग झाल्या.
त्यापैकी किती तक्रारींची दखल घेण्यात आली. याची सर्व माहिती ऑनलाईनच्या माध्यमातून हेस्काॅमच्या सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांना कार्यालयात बसल्याजागी मिळणार आहे. त्यामुळे तक्रार निवारण करण्याबरोबरच लाईनमन कार्यरत आहेत की नाही? याची माहिती देखील ॲपच्या माध्यमातून मिळणार आहे.
यापूर्वी हेस्काॅमने ऑनलाईन वीज भरण्याची सोय केल्याने ग्राहक घरबसल्या विजेचे बिल भरत आहेत. तसेच आता लवकरच एका क्लिकवर त्यांना विजेसंदर्भातील तक्रारी देखील दाखल करता येणार असून त्यांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.