Saturday, January 11, 2025

/

मोर्चा तूर्तास स्थगित मात्र रद्द नाही!

 belgaum

कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेसमोर फडकाविलेला लाल – पिवळा हटविण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती, युवा समिती, शिवसेनेच्यावतीने प्रशासनाशी चर्चा करण्यात आली. यासाठी २० जानेवारीपर्यंतचा वेळ प्रशासनाने दिला होता. परंतु अद्यापही हा ध्वज हटविण्यात न आल्याने २१ जानेवारी रोजी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु आज डीसीपी विक्रम आमटे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा मोर्चा स्थगित करण्याची विनंती करण्यात आली आहे.

यासंदर्भात युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी बेळगाव लाईव्हशी संवाद साधला. ते म्हणाले की, पोलिसांनी २१ तारखेच्या महामोर्चाला परवानगी नाकारली असून समितीकडे चर्चेसाठी वेळ मागितला आहे. मराठी कार्यकर्त्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी हा मोर्चा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाकडून गृहमंत्र्यांच्या दौऱ्याचे कारण पुढे करण्यात आले असून चर्चेसाठी दिलेला वेळ पाळता आला नसल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु येत्या ४ दिवसात या प्रश्नावर नक्की तोडगा काढू, असे आश्वासन डीसीपी विक्रम आमटे यांनी दिले आहे. उद्याचा मोर्चा हा हजारोंच्या संख्येने होईल, आणि मराठी भाषिकांची एकजूट होईल, याची धास्ती पोलीस प्रशासनाने घेतली असल्याचे जाणवले, असे शुभम शेळके म्हणाले.

येत्या चर्चेत कोणताही तोडगा निघाला नाही, तर तुम्ही खुशाल मोर्चा काढा, असेही विक्रम आमटे यांनी सुचवले आहे. चर्चेसाठीची ही शेवटची बैठक असून यासाठी प्रशासनाला शेवटची संधी देण्यात आली आहे. या बैठकीत चर्चा विफल झाल्यास आम्ही नक्की मोर्चा काढून मराठी माणसाची ताकद दाखवू. मराठी माणसाचे प्रतीक असणाऱ्या भगव्याचा अपमान आम्ही खपवून घेणार नाही, आणि नियोजित स्थळीच भगवा फडकविण्याचे निर्धार शेळके यांनी व्यक्त केला. आज दिवसभर पोलीस प्रशासनाशी चर्चा करण्यात वेळ गेला असून प्रशासनाचे वेळकाढूपणाचे लक्षण जाणवत असल्याचे शेळके यांनी नमूद केले. उद्या समिती, शिवसेना आणि इतर मान्यवर जिल्हाधिकाऱ्यांची प्रातिनिधिक भेट घेणार आहेत. यासंदर्भात २४ किंवा २५ तारखेला सखोल चर्चेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी वेळ दिला आहे. हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असून रद्द करण्यात आले नाही, याची नोंद मराठी जनतेने घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.