महानगरपालिकेसमोर अनधिकृत लाल-पिवळा ध्वज बेकायदेशीर रित्या उभारण्यात आला असून हा ध्वज त्वरित हटविण्यात यावा, यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने आज जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना निवेदन देण्यात आले.
सीमाभागातील मराठी माणसांचे नेतृत्व करणारी महाराष्ट्र एकीकरण समिती १९५६ सालापासून शांततेच्या मार्गाने आपला लढा देत आहे. बेळगावसह मराठी बहुल भाग हा महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी तसेच मराठी भाषिकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात केंद्र आणि राज्यसरकारविरोधात कायदेशीर लढा देत आहे. बेळगावसह संपूर्ण सीमाभागाचा समावेश महाराष्ट्रात करण्यासाठी सीमाप्रश्नाचा खटला सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ट आहे. बेळगावमध्ये सर्वाधिक मराठी भाषिक आहेत. परंतु काही कन्नड संघटनांच्या माध्यमातून मराठी भाषिकांना डिवचण्याचा तसेच बेळगावची शांतता भंग करण्याचा प्रयत्न होत आहे. दि. २२ डिसेंबर रोजी बेळगाव महानगरपालिकेच्या इमारतीसमोर काही कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी लाल-पिवळा ध्वज बेकायदेशीरपणे फडकविला आहे.
महानगरपालिकेच्या अवघ्या १०० मीटर व्याप्तीत जिल्हापोलिसप्रमुख आणि पोलीस आयुक्तांची कचेरी आहे. परंतु हे कृत्य होण्यापासून पोलिसांनी कन्नड कार्यकर्त्यांना रोखले नाही. हा ध्वज हटविण्यासंदर्भात महाराष्ट्र एकीकरण समिती, युवा समिती आणि इतर मराठी भाषिक संघटनांच्या वतीने मागणी करण्यात आली आहे. परंतु त्या कन्नड कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कोणतीही कारवाई आतापर्यंत केली नाही.
बेळगाव महानगरपालिकेवर निवडून येणाऱ्या नगरसेवकांमध्ये मराठी भाषिक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांची संख्या अधिक आहे. परंतु काही कन्नड संघटनांच्या वतीने बेळगावची शांतता आणि कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचे काम करण्यात येत आहे.
महानगरपालिकेसमोर फडकविण्यात आलेल्या ध्वज हा अनधिकृत आहे. हा ध्वज त्वरित हटविण्यात यावा, अन्यथा सीमाभागातील प्रत्येक गल्लीसमोर भगवा ध्वज फडकविण्यात येईल, तसेच महानगरपालिकेसमोर भगवा झेंडा फडकविण्यात येईल. आणि शांतता बिघडवून मराठी भाषिकांना डिवचण्याचा प्रयत्न करणाऱ्या कन्नड संघटनांना चोख प्रत्त्युत्तर देण्यात येईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चावेळी महाराष्ट्र एकीकरण समिती, युवा समिती, शिवसेना नेते तसेच इतर उपस्थित होते.
महाराष्ट्र समितीचा जिल्हा बेळगाव प्रशासनाला अनाधिकृत ध्वजा बाबत अलटीमेटम…अन्यथा मनपा वर भगवा फडकावू
https://www.facebook.com/375504746140458/posts/1299528350404755/
https://www.facebook.com/375504746140458/posts/1299527477071509/