महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून लवकरच मोठ्या हालचाली होण्याचे संकेत मिळत आहेत. यासंदर्भात २७ जानेवारी रोजी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलाविण्यात आली आहे, अशी विश्वसनीय माहिती उपलब्ध झाली आहे.
या बैठकीला महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ आदी नेते उपस्थित राहणार आहेत. यासोबतच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनाही बैठकीचे आमंत्रण देण्यात आले आहे. मात्र कर्नाटकात भाजपचे सरकार असल्यामुळे आता भाजप सीमाप्रश्नाआवर कोणती भूमिका घेईल, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.
बेळगावमध्ये नुकत्याच पार पडलेल्या हुतात्मा दिनानंतर सीमाप्रश्नाच्या मुद्द्यावरून वातावरण पुन्हा तापायला सुरुवात झाली आहे. शिवसेना नेते राजेंद्र पाटील यांनी हुतात्मा दिनी बेळगावात जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, कर्नाटक पोलिसांनी त्यांना कोगनोळी टोलनाक्यावर रोखले होते. यानंतर शिवसैनिकांनी बेळगावमध्ये कोणत्याही परिस्थिती भगवा फडकविण्याचा निर्धार केला होता.
सीमाभागातील मराठी बांधवांच्या भावना दुखावणारा लाल – पिवळा हटवावा, अशी मागणी शिवसैनिकांनी केली होती. तसेच मनपासमोर भगवा फडकवावा अशीही मागणी करण्यात आली आहे. परंतु प्रशासनाने या प्रश्नासंदर्भात टाळाटाळ केली असून अद्याप कोणतीही भूमिका प्रशासनाने स्पष्ट केली नाही.