कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर देशातील बहुतेक मंदिरे बंद आहेत. धार्मिक विधी आणि कमीतकमी गर्दीत, ठराविक वेळेत काही देवस्थाने खुली आहेत. परंतु अनेक जागृत देवस्थान गर्दीच्या कारणासाठी बंद ठेवण्यात आली आहेत.
येत्या पौष पौर्णिमेनिमित्त रायबाग तालुक्यातील चिंचली मायाक्का देवस्थानात जत्रा भरविण्यात येते. अनेक भाविक या पौर्णिमेच्या निमित्ताने चिंचली येथे दर्शनासाठी येतात. परंतु सध्या देवस्थान बंद असल्यामुळे भाविकांची अडचण होत आहे. यासाठी श्रीरामसेना कर्नाटक, तालुका घटक – रायबाग यांच्यावतीने तहसीलदारांना हे देवस्थान खुले करण्यासाठी निवेदन देण्यात आले.
या निवेदनाचा विचार करून कोविड १९ च्या सर्व खबरदारीच्या उपाययोजनांसह आणि नियम अटींसह हे देवस्थान खुले करण्यासंबंधी तहसीलदारांनी परवानगी दिली आहे.
मंगळवारपासून हे देवस्थान भाविकांसाठी खुले करण्यात आले असून, कमीतकमी भाविकांच्या उपस्थितीत, धार्मिक विधी आटोपणे, मास्क, सॅनिटायझर आणि थर्मल स्क्रीनिंग अनिवार्य करण्यात आले आहे. देवस्थान दर्शनासाठी खुले करण्यात आल्यामुळे भाविकांच्यावतीने फटाकड्या वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.