रस्त्यावरील लोकांच्या जीवाची पर्वा न करता अत्यंत निष्काळजीपणे भरधाव वेगाने आपली बस चालविण्याचा प्रकार राज्य परिवहन मंडळाच्या एका सिटीबस चालकाने केल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरल्याची घटना आज सकाळी घडली.
बेळगाव -राकसकोप मार्गावर आज सकाळी परिवहन मंडळाचा एक सिटीबस चालक बेभानपणे भरधाव वेगाने आपली बस ( क्र. केए 42 एफ 1656) चालवताना दिसून आला.
सदर मार्गावरील गणेशपुरसह अन्य गावांच्या ठिकाणी सकाळच्या वेळी नेहमी गर्दी असते. मात्र रस्त्यावरून ये-जा करणार्या नागरिकांच्या जीवाची पर्वा न करता संबंधित बस चालकाने आपली बस सुसाट सोडली होती.
रस्त्यावरून जाणारे कांही दुचाकी चालक तर दैव बलवत्तर म्हणून बसच्या धडकेपासून थोडक्यात बचावले. संबंधित बस चालकाला थांबून कांही जागरूक नागरिकांनी जाब विचारला असता त्याने उद्धट उत्तरे दिल्याचे समजते. तरी परिवहन मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा बस चालकांना चांगली समज द्यावी, अशी मागणी केली जात आहे.