सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेना आणि सीमाभागातील मराठी जनतेला महाराष्ट्रातील वाढत्या पाठिंब्यामुळे कन्नड रक्षण वेदिकेला घाम फुटत आहे. महानगरपालिकेसमोर फडकविण्यात आलेल्या लाल -पिवळा वरून सुरु असलेला मराठी भाषिकांचा संघर्ष हा कन्नड संघटनांसह प्रशासनालादेखील धास्तावणारा ठरला आहे.
त्यामुळे आपले शक्ती प्रदर्शन दाखविण्यासाठी विविध जिल्ह्यातून जवळपास ३० वाहनातून आलेल्या भाडोत्री कार्यकर्त्यांनी चन्नममा सर्कल येथे समिती आणि शिवसेनाविरोधात निदर्शने केली.
यादरम्यान पोलिसांनी या कार्यकर्त्यांना अटक केली आहे. हिरेबागेवाडी गेट जवळ विविध जिल्ह्यातून जवळपास ३० वाहनातून आलेल्या कन्नड रक्षण वेदिकेच्या कर नाटकी युवा कार्यकर्त्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हिरेबागेवाडी येथे आलेल्या या युवा कार्यकर्त्यांनी त्याचठिकाणी आंदोलनाला सुरुवात केली. त्यानंतर पदयात्रा काढून चन्नम्मा सर्कल येथे आंदोलनाद्वारे दाखल झाले. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेच्या विरोधात या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने केली.
महापालिकेसमोरील ध्वज हटविण्यात यावा यासाठी समिती आणि शिवसेनेच्यावतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहराच्या शांतता आणि सुव्यवस्थेला कोणताही धक्का पोहोचू नये, आणि अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने मराठी माणसाच्या आंदोलनावर दडपशाही केली. परंतु अशा भाडोत्री कार्यकर्त्यांमुळे शहराची शांतता भंग होत नाही का? अशी आंदोलने कर नाटकी कार्यकर्त्यांना करण्यासाठी कोणता कायदा लागू होतो? कर्नाटकात केवळ मराठी जनतेलाच कायदा लागू होतो का? आणि कन्नड कार्यकर्ते मात्र मोकाटच आहेत का? असे अनेक प्रश्न संतापलेला मराठी माणूस विचारात आहे.
मराठी माणसाविरोधात होणारे हे निरुपयोगी उद्योग वेळीच बंद न झाल्यास प्रशासन आणि पोलिसांना मराठी माणसाचा दबदबा दिसून येईल, यात शंका नाही.