कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी महाराष्ट्र एकीकरण समिती, सीमाभाग आणि अरविंद पाटील यांच्या बाबतीत पुन्हा एकदा बालिश वक्तव्य केले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे अस्तित्व संपुष्टात आल्याची दर्पोक्ती केली आहे. त्यांच्या या वक्तव्याचा खानापूर महाराष्ट्र एकीकरण समिती विभागाच्यावतीने निषेध करण्यात आला असून या वक्तव्यानंतर मध्यवर्ती महाराष्ट्र्र एकीकरण समितीने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे.
हुतात्मादिनापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सर्व महाराष्ट्र मंत्रिमंडळाने सीमाभागातील मराठी जनतेच्या लढ्याला जाहीर पाठिंबा दर्शविला. मराठी बहुल भाग महाराष्ट्रात नक्की आणू यावर सर्व नेत्यांनी शिक्कामोर्तब केले. यानंतर कन्नड संघटना आणि राजकीय नेत्यांनी थयथयाट सुरु केला. त्यानंतर पुन्हा सीमाप्रश्नावर आधारित पुस्तकाचे महाराष्ट्रात प्रकाशन करण्यात आले. दरम्यान या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीमाप्रश्नावर सडेतोड भूमिका मंडळी. या सर्व गोष्टी कर्नाटकी नेत्यांना झोंबल्या असून आता सर्वच नेत्यांनी आणि कन्नड संघटनानी त्या वक्तव्यावर उलट सुलट आणि बेताल वक्तव्य करण्यास सुरुवात केली आहे.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अस्तित्व संपुष्टात आले असून महाराष्ट्र समितीमधील अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये सामील होत असल्याचे लक्ष्मण सवदी यांनी म्हटले आहे. यासोबतच खानापूरचे माजी आमदार अरविंद पाटील हेही भाजप समर्थक असून लवकरच ते भाजपमध्ये सामील होणार आहेत. शिवाय अरविंद पाटील यांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी खानापूर तालुक्यातून भाजपाची उमेदवारी देण्यात येणार आहे. अशाचप्रकारे सर्व नेते भाजपमध्ये सामील होणार असून, महाराष्ट्र एकीकरण समिती संपुष्टात येणार असल्याचे वक्तव्य लक्ष्मण सवदी यांनी केले आहे. या सर्व वक्तव्यांचा विचार करून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने तसेच माजी आमदार अरविंद पाटील यांनी यासंदर्भात आपली भूमिका सीमावासीयांसमोर स्पष्ट करावी, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली.
या बैठकीला माजी आमदार दिगंबर पाटील, यशवंत बिर्जे, आबासाहेब दळवी, विवेक गिरी, महादेव घाडी, प्रकाश चव्हाण, देवप्पा भोसले यांच्यासह इतर समिती नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.