कार आणि दुचाकी यांच्यात धडक होऊन घडलेल्या अपघातात दुचाकीस्वार विद्यार्थी जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी केएलई रोडवरील केएफसीसमोर घडली.
साईराज संभाजी कडोलकर (वय 22, रा. काकती) असे अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्याचे नांव आहे. साईराज हा महाविद्यालयीन विद्यार्थी होता.
शहरातील आरएलएस महाविद्यालयामध्ये त्यांनी यंदा बीएससीसाठी ऍडमिशन घेतले होते. साईराज आपल्या दुचाकीवरून आज दुपारी 3:45 वाजण्याच्या सुमारास बेळगावहून काकतीच्या दिशेने भरधाव वेगात निघाला होता. त्यावेळी जिल्हा क्रीडांगणाकडून मुख्य रस्त्याकडे येणाऱ्या कार गाडीला त्याने जोराची धडक दिली.
ही धडक इतकी जोराची होती की साईराज याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याप्रकरणी रहदारी उत्तर पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे.
दरम्यान, शहरातील दुचाकी अपघातात दिवसेंदिवस वाढ होत असून याबाबत गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.