पोलिस प्रशासनाच्या विनंतीवरून महामोर्चा तुर्तास केल्यानंतर बेळगाव महापालिकेसमोरील लाल -पिवळा ध्वज हटविण्यासंदर्भात म. ए. समितीच्या नेत्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी नेत्यांनी केलेल्या विनंतीवरून जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या 28 किंवा 29 जानेवारी रोजी त्या ध्वजाबाबत बैठक घेण्यास होकार दिला आहे.
बेळगाव महानगरपालिकेसमोर उभारलेला अनाधिकृत लाल-पिवळा ध्वज हटवावा या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने आज गुरुवारी महामोर्चा काढण्यात येणार होता. मात्र हा मोर्चा काढू नये या पोलिस प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन मोर्चा स्थगीत करण्यात आला. त्यानंतर आज म. ए. समितीच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची भेट घेतली.
त्यावेळी येत्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात बैठक घेऊ असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. मात्र फार उशीर होणार
असल्याने समिती नेत्यांनी जानेवारी 28 किंवा 29 रोजी बैठक घेऊन लाल-पिवळ्या ध्वजाबाबत निर्णय द्या अशी विनंती केली.
ही विनंती जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केली आहे. आजच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीप्रसंगी लाल -पिवळ्या ध्वजाजवळ आम्ही देखील भगवा ध्वज उभारतो. त्यानंतर निर्णय घेऊन दोन्ही ध्वज हटवायचे असतील तर हटवा, असा अट्टाहास समितीच्या नेत्यांनी धरला होता. त्यावर तसे कांही करु नका, अशी विनंती जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी केली.
याप्रसंगी मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके,
राजाभाऊ पाटील, नेताजी जाधव, मदन बामणे, दत्ता उघडे, संजय मंडलिक, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, दत्ता जाधव, अरविंद नागनुरी, प्रवीण तेजम आदी उपस्थित होते.