Sunday, October 6, 2024

/

शिकार कुणाची?

 belgaum

सीमाभागातील ग्रामपंचायतीच्या निकालाला धुरळा खाली बसत असतानाच अनेक गोष्टी अधोरेखित केल्या जात आहेत. निकालाकडे वारंवार पाहता काही गोष्टी सहज लक्षात येत नसल्या तरी काही गोष्टींचा दूरगामी परिणाम होणार आहे. या निकालातून अनेक बाबी पुढे येणार आहेत, हे सहज लक्षात येते. भाजप सध्या ग्रामीण भागात आणि एकंदर ग्रामीण मतदार संघात गेल्या दोन अडीच वर्षात खूप मागे गेले आहे. याचे कारण भाजपा स्वतःचे आत्मपरीक्षण करण्यास कमी पडत आहे.

भाजपचे ग्रामीण भागात असणारे नेतृत्व त्यामानाने कमकुवत आहे. कित्येक पदाधिकारी कार्यरत नाहीत. त्यांच्याविषयी जनतेमध्ये असणारा असंतोष हा भाजप वरिष्ठांपर्यंत पोहोचत नाही. ग्रामीण भागाचा निकाल पाहता ही बाब भाजप वरिष्ठांनी लक्षात घेऊन ग्रामीण भागात त्यांची ढिली पडत असलेली पकड मजबूत करण्यासाठी वाटचाल केली पाहिजे.

याच्याच दुसऱ्या बाजूला असणाऱ्या काँग्रेसने मात्र विद्यमान आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यामार्फत एकहाती प्रचार करून काँग्रेसची पाळेमुळे गामीण भागात घट्ट काही अंशी घट्ट केली आहेत. काँग्रेसचे मूळ आणखी मजबूत करण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील असून नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांचेच समर्थक निवडून आले असल्याचा दावाही काँग्रेसने केला आहे.

एका बाजूला भाजप अधिक जागा बळकाविल्याचा दावा करत आहे तर दुसऱ्याबाजूला काँग्रेस अधिक जागा बळकाविल्याचा दावा करत आहे. परंतु तालुक्यात मराठी भाषिकांचे वर्चस्व निर्विवाद सिद्ध झाले असून सर्वात महत्वाची बाब म्हणजे ग्रामपंचायत निवडणुकीत बेळगाव तालुक्यात मराठी भाषिकांनी नेतृत्वाशिवाय स्वबळावर निवडणूक लढवून मराठी जनतेचे वर्चस्व प्रस्थापित केले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाशिवाय हि निवडणूक लढविण्यात आली असून जितक्या जागा समिती नेतृत्वाशिवाय लढवून जिंकण्यात आल्या, यापेक्षा अधिक जागा समितीच्या नेतृत्वासह जिंकण्याची संधी होती. परंतु आपापसातील मतभेद बाजूला न ठेवता गटा- तटाच्या राजकारणामुळे ही संधी गमवावी लागली, अशी चर्चा ग्रामीण भागात होत आहे.

सध्याचे तालुक्यातील चित्र पाहता मराठी जनता एकजूट झाली आहे. याचे गांभीर्य ओळखून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीने ग्रामीण भागात जोरदार मोर्चेबांधणी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.