आज मकर संक्रांति दिवशी बेळगाव शहरात अफवांचे जणू पिकच पसरवले जात असून काय खरे? – काय खोटे? असा संभ्रम नागरिकात निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. तथापि अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन सोशल मीडियावर करण्यात येत आहे.
मकर संक्रांती सारख्या आनंदाच्या सणा दिवशी आज सकाळपासून बेळगाव शहरात अफवांचे पीक पसरविले जात आहे. कुणाच्या घराला आग लागली, कुणा लोकप्रतिनिधींच्या पत्नीचे निधन झाले, कुणाचा अपघात झाला अशा एक ना अनेक अफवा पसरविल्या जात आहेत.
या अफवांमुळे अनेक जण संभ्रमात सापडले आहेत. गोंधळलेल्या अथवा कळालेल्या बातमीमुळे धक्का बसलेल्या बरेचजण आपल्या निकटवर्तीयांना फोनाफोनी करून समजलेल्या बातमीची शहानिशा करण्याच्या मागे लागल्याचे पाहावयास मिळत आहे.
तथापि या सर्व अफवा असून त्यावर विश्वास ठेवण्याची गरज नाही. या संक्रांतीला अशा खोट्या बातम्यांपासून सावध राहूया! असे आवाहन करण्यात येत आहे.