दीर्घकाळ प्रतीक्षा करावयास लावलेल्या कोविडशिल्ड अर्थात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला आज शनिवारी अखेर प्रारंभ झाला आहे.
शहरातील केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि बीम्स हॉस्पिटलसह जिल्ह्यात विविध 13 ठिकाणी सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून ही लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. आरोग्य खात्याने निवडलेल्या आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी कार्यकर्त्या आणि आरोग्य सेवक -कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे.
अथणी तालुका इस्पितळांमध्ये आज सकाळी लसीकरण शुभारंभाप्रसंगी स्वतः जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ हे जातीने उपस्थित होते. त्यांनी टाळ्या वाजवून लसीकरण मोहिमेचा शुभारंभ केला.
तसेच मार्गदर्शक सूचनांचे पालन करून लसीकरण केले जावे, अशी सूचना अथणी इस्पितळातील आरोग्य अधिकाऱ्यांना दिली. याप्रसंगी जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. यांच्यासह जिल्हा आरोग्य खात्याचे अधिकारी उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार दररोज 100 जणांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे.