बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीतील मासगौडनहट्टी गावातील यल्लाप्पा मारुती धामणेकर (वय २४, रा. मासगौडनहट्टी ) याने मयत महादेव मिनाजी मेलगे (वय ४२, रा. मासगौडनहट्टी) यांच्यावर किरकोळ कारणातून हल्ला करून खून केला होता.
मयत महादेव मिनाजी मेलगे यांचे किराणा दुकान होते. त्यांच्या किराणा दुकानात आरोपी यल्लाप्पा मारुती धामणेकर याची उधारी शिल्लक होती. दरम्यान पुन्हा काही सामान उधारीवर मागितल्याने मयत महादेव मिनाजी मेलगे यांनी नकार देऊन उधारीवर साहित्य देणे बंद केले असल्याचे सांगितले. तसेच पूर्वीची उधारी देण्याची मागणी केली. यावेळी आरोपी यल्लाप्पा याला राग अनावर झाला आणि त्याने महादेव यांच्यावर हल्ला केला.
११ नोव्हेंबर २०१८ रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास दुकानासमोर मोठ्या आवाजात टेपरेकॉर्डर लावण्यात आल्याने महादेव मेलगे यांनी यल्लाप्पा याला आवाज कमी करण्यासाठी सांगितले. आपल्या दुकानात लहान मुले येतात. त्यामुळे आवाज कमी करण्यासाठी त्यांनी यल्लप्पाला विनंती केली. परंतु त्यांच्या दुकानात उधारीवर साहित्य न दिल्याचा राग आणि पुन्हा टेपरेकॉर्डरचा आवाज कमी करण्यासाठी केलेली विनंती या दोन्ही गोष्टी एकत्र करून आरोपीने महादेव यांच्यासोबत वाद सुरु केला.
दुकानात उधारीही देत नाही आणि रस्त्यावर आवाज कमी करण्यासाठी सांगणाऱ्याचे आम्ही ऐकत नाही, रस्त्यावर अजूनही आवाज कारेन, आणि पुन्हा आवाज कमी करण्यास सांगितला तर खून करेन, असे म्हणत लोखंडी रॉड ने डोक्यावर जोराने हल्ला केला. या हल्ल्यात महादेव जबर जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु १३ नोव्हेंबर २०१८ रोजी महादेव यांचा मृत्यू झाला.
यासंदर्भात मयत महादेव यांचे बंधू गंगाराम यांनी कृष्णवेणी गुर्लहोसूर आणि संगमेष शिवयोगी यांच्या सहकार्याने ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार नोंदविली. तक्रार दाखल केल्यानंतर दुसरे अधिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जे. नंजुडय्या यांनी आरोपीला जन्मठेप आणि १०००० रुपये दंड ठोठावला. यासोबतच दंड भरण्यास टाळाटाळ केल्यास एक महिन्याची कठोर शिक्षा देखील सुनावली आहे. याप्रकरणी सरकारी वकील जी.के. माहूरकर यांनी काम पाहिले. १६ जणांच्या साक्षी आणि ३० दाखल्यांच्या आधारे तसेच १ ते ६ मुद्देमालासह हि सुनावणी करण्यात आली आहे.