सिटीझन कौन्सिलच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची भेट घेऊन शहरातील विविध समस्या आणि असुविधेबाबत चर्चा करून या समस्या सोडविण्यासाठी आणि जनतेला विविध सेवा पुरविण्यासाठी आवाहन केले. आणि या सुविधा जनतेपर्यंत लवकरात लवकर पोहोचविण्यासाठी निवेदन देण्यात आले.
शहरात बेळगावसह गोवा आणि महाराष्ट्रातील अनेक लोक येतात. शिवाय मराठा लाईट इन्फन्ट्री आणि कर्नाटकची दुसरी राजधानी म्हणून बेळगावचे नाव घेतले जाते.
परंतु अद्यापही बेळगावमधील जनता अनेक गैरसोयींना सामोरी जात आहे. यासंदर्भातील बाबी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास सिटीझन कौन्सिलच्या वतीने आणून देण्यात आल्या. तसेच यासंदर्भात सविस्तरपणे जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
या बैठकीत व्यापार परवाना, व्यापार – उद्योगातील बेळगावचे वैशिष्ट्य, विविध सेवा – सुविधांसाठी ऑनलाईन पोर्टल, महानगरपालिकेची हेल्पलाईन सुविधा, शहरात जनता शौचालयांची निर्मिती, बाजारपेठेत मिनीबसची सोय, बाजारपेठेसह इतर सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या यंत्रे स्थापन करणे, पार्किंग समस्या, टॅक्स संबंधी समस्या, महिला आणि ज्येष्ठांसाठी उद्याने आणि वॉकर्स झोनची व्यवस्था, व्यावसायिक – बाजारपेठेत सीसीटीव्ही व्यवस्था, ग्रीन सिटी योजना कार्यान्वित करणे, जनता तक्रार केंद्र अशा अनेक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
यावेळी सिटीझन कौन्सिलचे अध्यक्ष सतीश तेंडुलकर, शेवंतीलाल शहा, विकास कलघटगी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.