चांगले कर्म आयुष्याच्या अंताला कामी येतात, असे म्हंटले जाते. याचीच प्रचिती आज सकाळी निधन पावलेल्या फ्रान्सिना जॉर्ज डेल्लासिंग या असहाय्य ख्रिश्चन वृद्धेच्या बाबतीत आली, जेंव्हा एका हिंदू युवकाने हेल्प फॉर नीडी संघटनेच्या मदतीने फ्रान्सिनावर ख्रिश्चन पद्धतीने अंत्यसंस्कार करविले.
याबाबतची अधिक माहिती अशी की, चव्हाट गल्ली येथील राहुल किल्लेकर हे गेल्या दहा-बारा वर्षांपासून फ्रान्सिना जॉर्ज डेल्लासिंग या असहाय्य ख्रिश्चन वृद्धेची देखभाल करत होते. गेल्या कांही महिन्यांपूर्वी त्यांनी सदर वृद्धेला संजीवनी फाउंडेशन या वृद्धाश्रमात दाखल केले होते.
त्याठिकाणी तिला सर्व प्रकारची वैद्यकीय मदत मिळवून देण्याबरोबरच तिच्याकडे व्यवस्थित लक्ष देऊन काळजी घेतली जाईल, याची खबरदारी राहुल किल्लेकर घेत होते.
कांही दिवसापूर्वी आरोग्याच्या तक्रारीमुळे फ्रान्सीना हिच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र उपचाराचा फायदा न होता आज गुरुवारी सकाळी तिचे निधन झाले. तिच्या निधनानंतर ख्रिश्चन अंत्यसंस्कार कसे केले जातात हे माहीत नसल्यामुळे राहुल यांनी हेल्प फाॅर नीडीकडे मदतीचा हात मागितला.
तेंव्हा सुरेश अनगोळकर यांच्या नेतृत्वाखाली हेल्प फॉर नीडी संघटनेच्या सायमन मंतेरो, सुनील धनावडे आदींनी पुढाकार घेऊन संबंधित मयत वृद्धेवर ख्रिश्चन दफनभूमीत ख्रिश्चन रितीप्रमाणे अंत्यसंस्काराचे सोपस्कार पार पाडले. याकामी त्यांना फिश मार्केट कॅम्प येथील चर्च आणि सेंट झेवियर्स चर्चच्या धर्मगुरूंचे सहकार्य लाभले.