जिल्हा पंचायत सभागृहात शुक्रवारी प्रगती आढावा बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हा पंचायत सीईओ दर्शन एच. व्ही. उपस्थित होते. या बैठकीत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मूलभूत सुविधा, पायाभूत सुविधांच्या विकासासह इतर कामकाजाविषयी चर्चा करण्यात आली. तसेच अपूर्ण असलेले कामकाज लवकरात लवकर पूर्ण करण्यासंबंधी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
चिकोडी येथील शाळेच्या दुरुस्तीचे कामकाज योग्यरितीने झाले नसल्यासंबंधी अनेक तक्रारी येत आहेत. याबाबत विभागीय शिक्षणाधिकारी आणि जिल्हा पंचायत सदस्यांनी याठिकाणी भेट देऊन पाहणी करावी, आणि अहवाल सादर करावा अशी सूचना त्यांनी दिली.
सार्वजनिक ठिकाणी तसेच ग्रामीण भागात वैयक्तिक शौचालय निर्माण करण्यासंदर्भात जिल्हा पंचायत सदस्यांकडून माहिती घेऊन, रेडिमेड शौचालय आणि दर्जेदार शौचालय निर्मिती करण्यात यावी, जनतेला शौचालय बांधणीसाठी कर्जाची आवश्यकता असल्यास कर्ज मंजूर करावे अशी सूचना दर्शन एच. व्ही. यांनी केली. यावेळी जिल्हा पंचायत सदस्यांनी शौचालयासाठी देण्यात येणार खर्च वाढवून देण्यासंबंधी आवाहन केले.
या बैठकीत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशीही चर्चा करण्यात आली. सर्वसामान्य जनता तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना योग्य आरोग्य सेवा पुरविणे, वैद्यकीय सुविधेची बिल थकबाकी त्वरित पूर्ण करण्यात यावी, तसेच मागील वर्षी कोविडमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे बरीच प्रगती कामे शिल्लक राहिली आहेत, ती यावर्षी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, अशा सूचना जिल्हा पंचायत अध्यक्षा आशा ऐहोळे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
शिक्षण, पाणी पुरवठा, आणि सार्वजनिक कामे लांबणीवर पडली असून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे कामकाज त्वरित पूर्ण करण्यासंबंधी तसेच या कामाची थकबाकी त्वरित भरावी यासाठी आदिकार्यांना सूचना करण्यात आल्या. तसेच अनुदान नसलेल्या मतदार संघात अनुदान पोहोचविण्यासाठी जिल्हा पंचायतिने जबाबदारीने कार्य पार पाडावे, अशी चर्चाही या बैठकीत करण्यात आली. या बैठकीला जिल्हा पंचायत सदस्य, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.