शहरात अलीकडे चोरी आणि गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. यामध्ये सीसीटीव्हीमुळे तपास करणे पोलिसांना मदतीचे ठरत असल्याने पोलिसांनी आता सीसीटीव्हीची सक्ती व्यापाऱ्यांना केली आहे. घर आणि दुकानांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबतची नोटीस मार्केट पोलीस ठाण्याकडून व्यापाऱ्यांना बजाविण्यात आली आहे.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कर्नाटक सार्वजनिक सुरक्षा अधिनियम २०१७ अन्वये ही नोटीस जारी करण्यात आली आहे. याचे पालन सर्वांनी कटाक्षाने करावे, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. नोटीस मिळालेल्या तीन दिवसाच्या आत पोलीस ठाण्याला आवश्यक ती माहिती कळवावी अशी सूचनाही केली आहे.
२४ तास कार्यरत राहणारे सीसीटीव्ही कॅमेरे घर, व्यापारी आस्थापनांवर बाहेरील परिसर कैद होईल अशा पद्धतीने बसविण्यात यावेत. कॅमेऱ्यामधील स्टोरेज कमीतकमी ३ दिवसांचा असावा, घरातील आणि दुकानातील सुरक्षारक्षकांची संख्या किती आहे? हे सुरक्षारक्षक कोणत्या कंपनीचे आहेत? याची माहिती देणे, तसेच त्या जागेचे ब्ल्यू प्रिंट, सीसीटीव्ही बसविण्यात आलेली ठिकाणे, इलेक्ट्रिक बोर्ड बसविलेले ठिकाण, आपत्कालीन ठिकाणाची माहिती देणे बंधनकारक आहे.
येणाऱ्या लोकांची व वाहनांची तपासणी करण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे बसवून तपासणी करणे आवश्यक आहे. आगीच्या घटनांवर मात करण्यासाठी अग्निशमन उपकरण बसविणे बंधनकारक आहे, अशी सूचना पोलीस निरीक्षक संगमेष शिवयोगी यांनी नोटिसीद्वारे केली आहे.
नोटीस मिळालेल्या तीन दिवसांच्या आत हि माहिती पोलीस ठाण्याला कळविणे बंधनकारक असून असे न झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई होईल, असा इशारा देण्यात आला आहे.