सतीश जारकीहोळी हे एक अपयशी नेते असून ते आर्टिफिशिअल राजकारणी असल्याची टीका पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी केली आहे. जारकीहोळी बंधूंमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर येत असून एकमेकांविरोधात आरोप -प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. सतीश जारकीहोळी यांनी काँग्रेसभवन येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना रमेश जारकीहोळी यांच्यावर केलेल्या टीकेचे प्रत्त्युत्तर रमेश जारकीहोळी यांनी आज दिले असून प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त होताना सतीश जारकीहोळी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
सर्वप्रथम नवी दिल्ली येथे शंकरानंद यांच्या घरी जाऊन आल्यानंतर गनमॅन ठेवण्यात आला. सामान्य व्यक्ती असूनही अशापद्धतीने घराबाहेर गनमॅन ठेवणारे सतीश जारकीहोळी हे आर्टिफिशिअल राजकारणी असल्याची टीका रमेश जारकीहोळींनी केली. मुख्यमंत्री पदाची स्वप्ने पाहण्यात मग्न असलेले सतीश जारकीहोळी यांचे नेतृत्वही लवकरच कोलॅप्स होईल, असे वक्तव्य रमेश जारकीहोळी यांनी केले.
माझे वडील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असूनही सतीश जारकीहोळी यांनी केलेले विधान हे लज्जास्पद असल्याचे ते म्हणाले. सतीश जारकीहोळी हे मोठे नेते नाहीत.
गेल्या सात वर्षांपासून आराम करत असलेले सतीश जारकीहोळी येत्या निवडणुकीत नेतृत्व गमावण्याच्या भीतीपोटी हताश असून काँग्रेसकडे पुढील दोन वर्षांसाठी कोणतेच काम नाही. सतीश जारकीहोळी हे प्रत्येक टप्प्यावर अपयशी ठरले असल्याची टीका रमेश जारकीहोळी यांनी प्रसारमाध्यमांसमोर केली आहे.