बेळगावच्या लोकसभा पोटनिवडणुकीसाठी अजून तारीख जाहीर झाली नाही. परंतु दिवसेंदिवस राष्ट्रीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांची संख्या वाढतच चालली आहे. बेळगावमधील अनेक दिग्गज नेत्यांसह आता सातासमुद्रापलीकडील इच्छुकांचीही नावेही चर्चेत येऊ लागली असून या निवडणुकीसाठी थेट अमेरिकेतून ऑनलाईन उमेदवारीसाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे.
बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील हुळ्ळूर गावातील व्यक्ती अमेरिकेत सेटल आहे. या व्यक्तीने एनआरआय म्हणजेच विदेशी कोट्यातून उमेदवारी मिळण्यासाठी भाजपकडे ऑनलाईन अर्ज दाखल केला आहे.
सूर्यकांत संत्रे असे बेळगाव जिल्ह्यातील इच्छुक व्यक्तीचे नाव असून हुळ्ळूर गावातुन अमेरिकेत एका जापनीज कंपनीमध्ये ही व्यक्ती कार्यरत आहे.
सध्या अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे वास्तव्यास असणारे शिंत्रे हे बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. भाजपाकडे त्यांनी उमेदवारीसाठी अर्ज केला असून अमित शहा आणि संतोष जे. यांना इमेल द्वारे त्यांनी उमेदवारी देण्यासाठी मागणी केली आहे.
दिल्लीतील भाजप कार्यालयात सूर्यकांत संत्रे यांनी संपर्क साधून यासंदर्भात माहिती दिली असून बेळगावची पोटनिवडणूक ही केवळ बेळगावपुरती मर्यादित राहिली नसून आता सातासमुद्रापलीकडे गेल्याची चर्चा बेळगावमध्ये रंगत आहे.