सर्वसामान्यपणे रहदारी पोलिसांनी एकदा दंड ठोठावला की वाहनचालक शहाणे होतात किंवा पुन्हा वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्यास ते धजावत नाहीत. मात्र बेळगावातील एका युवकाने वाहतूक नियमांचे एक-दोनदा नव्हे तर तब्बल 72 वेळा उल्लंघन केल्याचा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी त्याच्याकडून 18,800 रुपये दंड देखील वसूल केला आहे. खुद्द पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी ही माहिती ट्विट केली आहे.
आरिफ जमादार (वय 28 वर्षे) असे या बेदरकार तरुणाचे नांव आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरिफ काल गुरुवारी आपल्या दुचाकीसह (केए 22 ईयू 6999) रहदारी पोलिसांच्या तावडीत सापडला. त्यावेळी त्यांनी त्याचे मागील रेकॉर्ड तपासले असता
त्याने गेल्या 2019 -20 या वर्षभरात एकूण 72 वेळा वाहतुकीचे नियम मोडल्याचे आढळून आले. नो पार्किंग मध्ये दुचाकी उभी करणे, हेल्मेट नसताना दुचाकी चालविणे, एकेरी वाहतुकीचे नियम मोडणे आदी गुन्हे त्याने केले आहेत. परिणामी या गुन्ह्यांप्रकरणी पोलिसांनी आरिफकडून 18,800 रुपयांचा दंड वसूल केला.
दंड वसूल केल्यानंतर पोलिसांनी आरिफ जमादार याला ताब्यात घेऊन त्याला वाहतूक नियमांचे पालन कसे करावे याचे प्रशिक्षण देण्याबरोबरच चांगली समज देखील दिली.
शहरांमध्ये एखाद्या व्यक्तीच्या विरोधात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचे एवढ्या मोठ्या संख्येने गुन्हे नोंदविण्याची आणि त्याचा दंड एकाचवेळी वसूल करण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी.