महाराष्ट्र एकीकरण समिती, युवा समिती आणि शिवसेना यांच्या वतीने गुरुवार दिनांक 21 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनासोबत काल झालेल्या बैठकीत डीसीपी विक्रम आमटे यांच्या विनंतीनुसार तूर्तास हा महामोर्चा स्थगित करण्यात आला आहे. हा मोर्चा स्थगित जरी झाला असला तरी जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने मराठी जनतेच्या एकजुटीची धास्ती मात्र घेतली आहे.
महानगरपालिकेसमोर काही कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बेकायदेशीररित्या फडकविलेला लाल – पिवळा हटविण्यासाठी समितीने मागणी केली होती. परंतु प्रशासनाने ठराविक वेळ दिला होता. या वेळेच्या आत हा ध्वज न हटविल्यास या महामोर्चाचा इशारा प्रशासनाला देण्यात आला होता. परंतु केंद्रीय गृहमंत्र्यांचा बेळगाव दौरा आणि इतर कामांच्या बंदोबस्ताची करणे पुढे करत समितीसोबत बैठक घेण्याचे जाणीवपूर्वक टाळण्यात आले आहे. प्रशासनाचा हा वेळकाढूपणा प्रत्येकाच्या लक्षात आला असून कायद्याची भाषा शिकवत मराठी माणसावर दडपशाही करणारे बेळगाव प्रशासन कन्नड संघटनांच्या बेकायदेशीर कृत्यांना पाठीशी घालत आहे.
सीमाभागातील मराठी जनतेच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र उभा असून आजचे आंदोलन स्थगित जरी करण्यात आले असले तरी कोल्हापूर शिवसेना आज सीमाभागात महानगरपालिकेसमोर भगवा झेंडा फडकविण्याच्या मुद्द्यावर ठाम आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकाच्या सीमा सीलबंद करण्यात आल्या असून, कोगनोळी, तुडये आणि शिनोळी परिसराच्या सीमेवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सीमाभागात येणाऱ्या प्रत्येक वाहनांची कसून चौकशी केली जात आहे. यासोबतच चन्नम्मा सर्कल, जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका आणि शहरातील महत्वाच्या ठिकाणीही कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामुळे आज पुन्हा एकदा सीमाभागाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
दुसऱ्या बाजूला हा पोलीस बंदोबस्त कितीही कडक असला, आपल्याला अटक जरी झाली तरी आपण सीमाभागात महानगरपालिकेसमोर भगवा ध्वज फडकाविणारच असा निर्धार शिवसेना नेत्यांनी केला आहे. कोल्हापूर शिवसेनेचे विजय देवणे आणि संजय पवार हे शिनोळी फाट्यावर दाखल झाले असून त्याठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. शिनोळीहून बेळगावमध्ये येऊन महानगरपालिकेसमोर हा भगवा फडकविण्याचा निर्धार यांनी केला आहे. या साऱ्या प्रकारची धास्ती बेळगाव पोलिसांनी घेतली असून प्रत्येक नाक्यावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
याचप्रमाणे शहरातील अनेक मराठी जनतेने आपापल्या घरावर भगवा फडकविण्याचा निर्धार केला असून समिती नेत्यांच्या कोणत्याही आवाहनाशिवाय तरुणांनी घरावर भगवा झेंडा फडकवून आपली अस्मिता दर्शवून दिली आहे. ‘नसेल भगवा शिरावर तर परका बसेल उरावर!’ अशा टॅगलाईनसह सोशल मीडियावर मिशन भगवा व्हायरल होत चालले आहे.