कन्नड कार्यकर्त्यांना नेमका कशाचा पोटशूळ उठेल याचा नेम नाही. आपण कशासाठी आवाज उठवत आहोत, कुणासाठी आवाज उठवत आहोत, आणि नेमकं आपल्याला काय साध्य करायचं आहे हेच या बिचाऱ्यांना माहीत नसतं.
सीमाभागात कन्नड संघटना नेहमीच या ना त्या कारणाने थयथयाट मांडत असतात. बुधवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुस्तक प्रदर्शन सोहळ्यात केलेल्या सीमाप्रश्नावरील भाषणानंतर कर्नाटकातील नेत्यांसह आता कन्नड संघटनाही थयथयाट करत आहेत.
कन्नड संघटनांनी आता मुंबई आपली असल्याची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. ‘कुणाच्या बापाचे काय आहे, मुंबई आमची आहे’ अशी बेताल घोषणा करून सीमाभागात नाहक निदर्शने करताना आज कन्नड संघटना दिसून आल्या आहेत.
करुनाड या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी चन्नम्मा सर्कल येथे हि निदर्शने केली असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिकृती दहन केली आहे. मुंबई हि कर्नाटकाची आहे. मुंबईने कर्नाटकात सामील व्हावे.अशी बेताल वक्तव्ये देखील या कार्यकर्त्यांनी केली.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी मुंबई कर्नाटकात सामील करावी, असे बेताल वक्तव्य केले. त्यानंतर कन्नड संघटनांना या वक्तव्यानंतर पेव फुटले.
आणि कन्नड संघटनांच्या तथाकथित कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून अशी बेताल वक्तव्य करण्यास सुरुवात केली आहे. बेळगाव या जन्मात महाराष्ट्रात सामील होणार नाही, उद्धव ठाकरे यांनी बेळगाव महाराष्ट्रात सामील करण्याचे दिवास्वप्न पाहणे बंद करण्याची पोकळ दर्पोक्तीदेखील या तथाकथित संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.