कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक सीमाभाग महाराष्ट्रात आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचे वक्तव्य १७ जानेवारी रोजी पाळण्यात आलेल्या हुतात्मादिनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते.
त्या वक्तव्यावरून कर्नाटकातील राजकीय नेते आणि कन्नड संघटनांनी थयथयाट सुरु केला आहे. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावरून कन्नड संघटनांच्या तथाकथित कार्यकर्त्यांना पोटशूळ उठला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा निषेध करत आज कन्नड संघटनांनी उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेचा अवमान करून आपला कंडू शमवून घेतला आहे. ठाकरे यांच्या वक्तव्यावर राजकीय नेतेमंडळींनीही उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. शहरात उद्धव ठाकरे यांच्या प्रतिकात्मक प्रतिकृतीचे दहन करत प्रतीकात्मक अंत्ययात्रादेखील काढली आहे.
या प्रकारानंतर मराठी भाषिकातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी अकलेचे तारे तोडत सोलापूर आणि सांगली कर्नाटकासाठी मागण्याची तारतम्य नसलेली मागणी केली आहे.
भाषावर प्रांतरचनेवेळी संपूर्ण सीमाभाग महाराष्ट्रात विलीन होणे गरजेचे होते. परंतु महाजन अहवालानुसार हा भाग कर्नाटकात डांबण्यात आला. हा संपूर्ण सीमाभाग आम्ही महाराष्ट्रात विलीन करून घेऊ. असे वक्तव्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा केले होते. या वक्तव्याचा कन्नड संघटनानी नेहमीप्रमाणे अर्धवट माहिती घेऊन थयथयाट सुरु केला असून बेळगावमध्ये उद्धव ठाकरे यांच्या निषेधार्थ आंदोलन छेडले.