केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज बेळगाव दौऱ्यावर असून विविध ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमानंतर जिल्हा क्रीडांगणावर आयोजित केलेल्या जनसेवक मेळाव्यात त्यांची प्रमुख उपस्थिती असेल. त्यानंतर केएलइ प्रांगणात असलेल्या के. एल. इ. हॉल मध्ये कोर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत लोकसभेसाठी भाजपच्या अधिकृत उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता आहे.
केंद्रात काँग्रेसची सत्ता असो अथवा भाजपाची, केंद्रीय मंत्री, राष्ट्रीय नेते आणि इतर दिग्गज मंडळी बेळगावमध्ये आल्यानंतर केएलई येथे भेट देत देत नाहीत, असे क्वचितच होते. यासंदर्भात प्रभाकर कोरे कधीही मागे हातात नाहीत, हेही तितकेच खरे आहे. प्रभाकर कोरे हे सत्तेत नसूनही अनेक स्तरावर आपला करिष्मा कायम ठेवला आहे. प्रभाकर कोरे हे जनतेचे नेते असल्याचेही मत व्यक्त होते. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रभाकर कोरे यांनी उमेदवारी मिळण्यासाठी भाजप हायकमांडकडे मागणी केली असल्याचीही माहिती आहे. हि उमेदवारी आपल्याला मिळाली नसली तरी आपल्या मुलाला मिळण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचेही बोलले जात आहे. माजी राज्यसभा सदस्य असलेले प्रभाकर कोरे हे सर्वतोपरी कसून प्रयत्न करत असल्याचीही माहिती सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे.
आज बेळगावमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची एंट्री होणार असून, त्यांच्या येण्याने भाजपचा अधिकृत उमेदवार घोषित होण्याच्या शक्यतेसोबतच लोकसभा निवडणुकीची तारीखदेखील जाहीर होण्याची शक्यता आहे. केएलई संस्थेच्या प्रांगणार होणाऱ्या कोर कमिटीच्या बैठकीनंतर या साऱ्या प्रकारावर पडदा पडून चित्र स्पष्ट होण्याची शक्यता राजकीय सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे.