कर्नाटक सरकारच्या मंत्रिमंडळात आता बेळगावातील तब्बल 5 मंत्र्यांचा समावेश असून इतर बरीच निगम व महामंडळे बेळगावच्या अखत्यारीत आहेत. त्यामुळे बेळगाव हे राज्यातील एक शक्ती केंद्र म्हणून उदयास आले आहे.
बेळगाव जिल्ह्यामध्ये हे पाच मंत्री आहेत. ज्यामध्ये परिवहन मंत्री व उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, जलसंपदामंत्री रमेश जारकीहोळी, महिला व बालकल्याण मंत्री शशिकला जोल्ले, वस्त्रोद्योग मंत्री श्रीमंत पाटील आणि आता मंत्री झालेले उमेश कत्ती यांचा समावेश आहे.
याव्यतिरिक्त राज्यातील अनेक निगम व महामंडळांचे नेतृत्व बेळगाव जिल्ह्यातील नेते मंडळींकडे आहे. त्यामुळे राज्यात राजधानी बेंगलोर नंतर आता बेळगाव जिल्हा असा आहे की, जेथे सर्वाधिक मंत्री आहेत.
बेळगावचे शंकरगौडा पाटील हे कर्नाटक सरकारचे दिल्ली येथील खास प्रतिनिधी आहेत. आमदार महांतेश कवटगीमठ हे विधान परिषदेचे मुख्य सचेतक असून आनंद मामनी विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत. कर्नाटक मिल्क फेडरेशन अर्थात केएमएफचे अध्यक्षपद भालचंद्र जारकीहोळी हे भूषवित असून डॉ. विश्वनाथ पाटील हे काडाचे अध्यक्ष आहेत.
त्याप्रमाणे आमदार पी. राजीव आणि महेश कुमठळ्ळी हे विविध निगमचे अध्यक्ष आहेत. या पद्धतीने राजकीय पटलावर बेळगाव जिल्ह्याची ताकद वाढली असल्यामुळे संबंधित लोकप्रतिनिधींकडून जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत.