बेळगाव कोरोना खबरदारीच्या मार्गसूचीनुसार देशभरातील अनेक देवस्थाने बंद ठेवण्यात आली होती. नित्यपूजा आणि केवळ प्रमुख पुजाऱ्यांच्या उपस्थितीत हि देवस्थाने सुरु होती. सध्या कोरोना परिस्थिती निमुळती झाली असून हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येण्याच्या मार्गावर आहे. याच पार्श्वभूमीवर प्रमुख देवस्थाने खुली करण्यासाठी अनेक संघटना आणि भक्तांच्यावतीने मागणी करण्यात येत होती. या मागणीचा विचार करून लवकरच हि देवस्थाने दर्शनासाठी खुली करण्यात येणार आहेत.
सौंदत्ती येथील यल्लम्मा देवस्थान 22 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2021 पर्यंत बंद ठेवण्याचा आदेश 18 जानेवारीला काढण्यात आला होता. त्यामुळे या ठिकाणी होणार 28 जानेवारीचा यात्रोत्सवदेखील रद्द करण्यात आला होता. देवस्थाने सुरू करण्यात यावीत, यासाठी भक्तांकडून जोरदार मागणी करण्यात आली होती.
कर्नाटकातील रेणुका देवीच्या दर्शनासाठी गोवा आणि महाराष्ट्रातील लाखो भाविक येतात. विशेषत: कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीही रेणुका मंदिर सुरू करण्यात यावे, अशी मागणी लावून धरली होती. यामुळे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी सौंदत्ती येथील रेणुका मंदिर, चिंचली (ता. रायबाग) येथील मायाक्का मंदिर, अथणी तालुक्यातील कोकटनूर येथील यल्लम्मा मंदिर, सोगल येथील सोमनाथ मंदिर यासह सर्व मंदिरे 1 फेब्रुवारीपासून खुली करण्याचा निर्णय घेतला आहे.
भक्तांसाठी हि देवस्थाने खुली करण्यात येणार असली तरी भक्तांना कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत सर्व यात्राही रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर मंदिर परिसरात भक्तांना राहता येणार नाही. सर्व निवासस्थाने बंद ठेवण्यात येणार आहेत.
भक्तांच्या अग्रहाखातर प्रशासनाने रेणुका मंदिर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. भक्तांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, गर्दी करू नये. यात्रा रद्द करण्यात आल्या असून निवासस्थाने बंद ठेवण्यात आली आहेत, याची दाखल घ्यावी, असे आवाहन धर्मादाय खात्याचे तहसीलदार डी. एन. जाधव यांनी केले आहे.