तुम्ही बऱ्याच लोकांच्या हाताला पाच नव्हे तर सहा बोटे पाहिली असतील. बऱ्याच कशाला बॉलिवूडचा अभिनेता हृतिक रोशनच्याही एका हाताला सहा बोटे आहेत. परंतु जगभरात अशा अनेक व्यक्ती आहेत, ज्यांच्या हाताला आणि पायाला मिळून २० हुन अधिक बोटे आहेत.
विज्ञानाच्या भाषेत अशा अधिक बोटे असणाऱ्या गोष्टीला ‘पॉलिडेक्टिली’ म्हणतात. बेळगावमध्येही अशाच एका तरुणाला हातापायाची मिळून तब्बल २४ बोटे आहेत. एका चहाच्या टपरीवर कामाला असणाऱ्या या तरुणाचा विषय सध्या कोर्ट परिसरासह बेळगावमध्ये अनेक ठिकाणी कुतूहलाचा विषय ठरला आहे.
जक्कनायकनकोप्प, ता. बैलहोंगल येथील भीमरायाप्पा (उर्फ रवी) तळवार (वय 19) असे या तरुणाचे नाव आहे. कोर्ट आवारात एका कॅंटीनमध्ये हा तरुण काम करत होता. हे कँटीन बंद झाल्याने त्यानंतर एका चहाच्या टपरीवर याने काम करण्यास सुरुवात केली. वकिलांसह न्यायालय आवारातील प्रत्येकाला चहा पुरविण्याचे काम हा तरुण करतो. दरम्यान या तरुणाच्या हाताला अधिक बोटे असल्याचे जाणवताच वकिलांनी कुतूहलाने या तरुणाला प्रश्न विचारले. यावेळी या तरुणाच्या हातालाच नाही तर पायलाही अधिक बोटे असल्याचे या तरुणाने सांगितले.
एका रिपोर्टनुसार सहा बोटे असलेल्या व्यक्तींमध्ये हे अधिकचे बोट अंगठा आणि तर्जनीच्या दरम्यान असते. त्यामुळे या व्यक्ती इतर व्यक्तींच्या तुलनेत सोप्या पद्धतीने काम करू शकतात. या व्यक्ती खूप उत्साहाने काम करतात. दरम्यान, या व्यक्तींना हातात ग्ल्व्हज आणि पायात मोजे घालणे कठीण होते. परंतु बेळगावमधील या तरुणाच्या हात-पायाला एखाद दुसरे नाही तर तब्बल चार बोटे अधिक आहेत. विशेष म्हणजे या तरुणाची सर्व बोटे नैसर्गिक असून त्याला काम करताना कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही.
या व्यक्ती निर्सगाची देण असतात, असे मानले जाते . प्रत्येक गोष्टीत यांना भाग्यवान मानले जाते. याचे उदाहरण म्हणजे प्रसिद्ध स्वप्ना बर्मन ज्यांच्या पायाला ६ बोटे आहेत. असे असतानाही तिने २०१८ मध्ये जकार्ता येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत हेप्थॅलॉनमध्ये भारताला पहिल्यांदा गोल्ड मेडल मिळवून दिले होते. अशा व्यक्ती इतर लोकांच्या तुलनेत वेगाने तसेच हुशारीने काम करतात.
टायपिंग असो वा गेम खेळणे वा अन्य कोणतेही काम. इतकेच नव्हे तर या व्यक्तींची बुद्धी इतर व्यक्तींच्या बुद्धीपेक्षा तल्लख असते. संशोधनकर्त्यांचे म्हणणे आहे की भविष्यात बनवल्या जाणाऱ्या रोबोटमध्ये सहा बोटे असायला हवीत ज्यामुळे तो अधिक स्फूर्तीने काम करू शकेल. सध्या बेळगावमधील २४ बोटे असणाऱ्या भीमरायाप्पा (उर्फ रवी) तळवार या तरुणाची चर्चा सर्वत्र चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय बनली आहे.