बेळगांव पोलीस आयुक्तालयाच्या नूतन इमारतीचा कोनशिला समारंभ ग्रहमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते झाला असला तरी आयुक्तालय इमारतीच्या आराखड्याबद्दल गृहमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
लिंगराज कॉलेजच्या मागील बाजूला असलेल्या सिटी पोलीस लाईन परिसरात 17 कोटी रुपये खर्चून बेळगांव पोलीस आयुक्तालयाची भव्य इमारत उभारली जाणार आहे. गृहमंत्री बोम्मई यांच्या हस्ते काल या इमारतीचा कोनशिला समारंभ पार पडला. त्यानंतर गृहमंत्र्यांनी पोलिस आयुक्तालय इमारतीचा आराखडा आणि नकाशा पाहून नाराजी व्यक्त केली. “तुम्ही एखादे सरकारी वस्तीगृह नव्हे तर प्रतिष्ठेच्या पोलीस आयुक्तालयाची उभारणी करत आहात, तेंव्हा त्याचा आराखडा यापेक्षा दर्जेदार असावयास हवा”, असे गृहमंत्री बोम्मई म्हणाले. तसेच मंजूर झालेल्या आराखड्यामध्ये त्यांनी कांही बदलही सुचविले.
अलीकडेच उद्घाटन झालेली म्हैसूर येथील आयुक्तालयाची नवी इमारत पहा, ललिता महाल पॅलेसच्या धर्तीवर बांधलेल्या या इमारतीची स्थापत्यकला अतिशय आकर्षक आहे. या इमारतीला सहा घुमट असून मध्यभागी एक मोठा घुमट आहे. पांढऱ्या हस्तीदंती रंगाची ही इमारत 4,268 चौरस फूट परिसरात विस्तारलेली आहे. सायमन अँड असोसिएट्स हे या इमारतीचे वास्तू शिल्पकार आहेत, आणि ही इमारत मणिपाल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने बांधली आहे.
ही पर्यावरणपूरक इमारत एकोणिसाव्या शतकातील वारसा पद्धतीने बांधण्यात आली आहे. या इमारतीच्या तुलनेत बेळगांवची नियोजित पोलीस आयुक्तालय इमारत अतिशय निस्तेज ठरणार आहे, असे गृहमंत्री बसवराज यांनी स्पष्ट केले. जेंव्हा इतक्या मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जात आहे, तेंव्हा त्याचे फलित देखील उत्तम असले पाहिजे असेही ते म्हणाले.