महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी प्रकल्प अधिकारी यांच्यातील समन्वयाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. दोन्ही विभागांकडून नागरिकांच्या समस्यांबाबत टोलवाटोलवी केली जात आहे.
मुख्य म्हणजे फोन करून तक्रार करून सुद्धा कोणीही दखल घेत नसल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मंडोळी रोडवरील दत्त मंदिरासमोरील रिमिक्स ड्रेनेज चेंबरची समस्या महिनोन् महिने येथे आहे.
मंडोळी रोडवरील दत्त मंदिरासमोरील रिमिक्स ड्रेनेज चेंबरच्या समस्येमुळे सांडपाणी तेथील नागरिकांच्या कंपाउंडमध्ये जात असून त्यांना निष्कारण दुर्गंधी सहन करत डासांचा सामना करावा लागत आहे. याबाबत शुक्रवारी सकाळी तेथील नागरिकांनी महानगरपालिकेला याबाबत कळवले. तेव्हा त्यांना आरोग्य खात्याकडे तक्रार करा असे सांगण्यात आले.
त्यानुसार आरोग्य खात्याकडे तक्रार केली तरीसुद्धा संध्याकाळपर्यंत महानगरपालिकेकडून कोणीही याठिकाणी फिरकले नाही. त्यामुळे ड्रेनेजचे पाणी कंपाउंडमध्ये तसेच असून नागरिकांच्या प्रश्नांबाबत महानगरपालिका किती बेफिकीर आहे याचेच प्रत्यंतर नागरिकांना येत आहे.
बेळगांव शहराचा स्मार्ट सिटी समावेश झाल्यानंतर लोकांना आपल्या शहराचा कायापालट होईल, असे वाटले होते. परंतु प्रत्यक्षात उलट घडत असून शहर अधिकाधिक विद्रूप होते आहे. याबाबत ना महानगरपालिका ना स्मार्ट सिटी प्रकल्पाचे अधिकारी गांभीर्याने विचार करत आहेत.
नवीनच घातलेल्या ड्रेनेज चेंबर स्मार्ट सिटीच्या कामांमध्ये फुटले असल्यामुळे स्मार्ट सिटी विभागाने चेंबर दुरुस्त करून दिले तर आपण लगेच या ठिकाणच्या अन्य समस्या दूर करू, असे महापालिकेचे अधिकारी सांगत आहेत. मात्र प्रत्यक्षात दोघांच्या वादात नागरिकांना मात्र निष्कारण त्रास सहन करावा लागत आहे.