यंदा कोऱोना प्रादुर्भाव आणि लाॅक डाऊनमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन नागरी सेवा परीक्षेसाठी (युपीएससी) इच्छुक उमेदवारांना पुढील वर्षी अतिरिक्त प्रयत्न करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी भ्रष्टाचार निर्मूलन परिवार बेळगांवतर्फे करण्यात आली आहे.
भ्रष्टाचार निर्मूलन परिवार बेळगांवचे अध्यक्ष सुजीत मुळगुंद यांनी एका निवेदनाद्वारे भारत सरकारच्या नवी दिल्ली येथील कर्मचारी सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या जितेंद्र सिंग यांच्याकडे उपरोक्त मागणी केली आहे. कोरोना प्रादुर्भाव व लॉक डाऊनच्या काळात यूपीएससीसाठी इच्छुक असलेल्यांना अतिशय बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागले आहे .
यासाठी पुढील वर्षीच्या नागरी सेवा परीक्षेसाठी अतिरिक्त प्रयत्नाची आणि वयाची सवलत दिली जावी. कारण आगामी यूपीएससी परीक्षा 2021 मध्ये असल्यामुळे कांही इच्छुकांची वयोमर्यादा उलटून जाणार आहे.
त्याचप्रमाणे त्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे कठीण जात आहे. तेंव्हा याचा गांभीर्याने विचार करून संबंधित इच्छुकांना परीक्षेसाठी आणखी एका प्रयत्नाची संधी द्यावी आणि पर्यायाने वयोमर्यादेत वाढ देखील करावी, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
सुजीत मुळगुंद यांनी सदर निवेदनाची प्रत देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री यांना देखील धाडली आहे.