पाय घसरून विहिरीत पडल्यामुळे दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवारी सकाळी बेकिनकेरे (ता. बेळगांव) येथे घडली. या दुर्घटनेमुळे बेकिनकेरे गावावर शोककळा पसरली आहे.
लोकेश विठ्ठल पाटील (वय 10 वर्षे, रा. बेकिनकेरे) आणि निखिल रामू बोंद्रे (वय 8 वर्षे, रा. ढेकोळी ता. चंदगड) अशी मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी मुलांची नांवे आहेत. निखिल हा बेकिनकेरे येथील आपल्या मामाच्या घरी राहण्यास आला होता. याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, सध्या शाळेला जावे लागत नसल्यामुळे आज सकाळी लोकेश व निखिल अन्य एका मित्राला घेऊन मौजमजा करण्यासाठी आपल्या घरच्या पाठीमागे असलेल्या शिवारात खेळण्यासाठी गेले होते. 8 ते 10 वर्षे वयोगटातील या मुलांपैकी लोकेश व निखिल खेळता खेळता पाय घसरून नजीकच्या जमिनीलगत असलेल्या विहिरीमध्ये पडले.
त्यावेळी आसपास कोणीही नसल्यामुळे ही घटना समजण्यास उशीर झाला. मुले घरी न परतल्यामुळे शोध घेतला असता प्रथम एका मुलाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला, मात्र पुन्हा विहिरीत शोधाशोध केली असता दुसऱ्या मुलाचा मृतदेहही हाती लागला. या दुर्घटनेतून तिसरा मुलगा सुदैवाने बचावला.
विहिरीत मुले पडल्याची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती. या घटनेची काकती पोलीस ठाण्यात नोंद झाली असून सीपीआय राघवेंद्र हल्लुर पीएसआय ए. वाय. अविनाश, शिवानंद कौजलगी आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
मयत लोकेश पाटील यांच्या पश्चात आई -वडील, बहीण, आजी व काका-काकू तर निखिल बोंद्रे त्याच्या पश्चात आई-वडील व लहान भाऊ असा परिवार आहे. या शाळकरी मुलांच्या मृत्यूमुळे बेकिनकेरे गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, बेकिनकेरे शिवार परिसरात वरीलप्रमाणे जवळपास 10-15 धोकादायक विहिरी वापराविना तशाच पडून आहेत. कठडा नसलेल्या जमिनीलगत असणाऱ्या या विहिरी पाहणाऱ्यांच्या सहसा निदर्शनास येत नाहीत. परिणामी रात्रीच्या वेळी तर या विहिरी अत्यंत धोकादायक ठरू शकतात. तेंव्हा संबंधित विहिरी ज्यांच्या मालकीच्या आहेत त्यांनी त्या तात्काळ बुजवाव्यात, अशी मागणी केली जात आहे.