शहर परिसरात रहदारी पोलिसांनी ठिकठिकाणी धडक मोहीम सुरु केली असून रविवार पेठ आणि कलमठ रोड परिसरात नो पार्किंग झोनमध्ये वाहने पार्क केलेल्या वाहनधारकांवर कारवाई केली आहे.
या कारवाईत ८ दुचाकींसह २ चारचाकी वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. शहर परिसरात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एरव्ही शनिवारी बाजारपेठेत गर्दी व्हायची. परंतु रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने तसेच लग्नसराईचा मौसम असल्याने बाजारपेठेत गर्दी वाढत आहे.
मुख्य बाजारपेठेत प्रवेश घेताना मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड यासोबतच गणपत गल्ली येथून तालुक्यातून लोक येतात. या सर्वांना वाहने पार्किंग साठी जागा उपलब्ध नसल्याने हे सर्व लोक थेट बाजारपेठेत वाहने घेऊन येतात. एकाठिकाणी वाहने पार्किंग करून बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी गेलेल्या लोकांच्या वाहनावर मात्र रहदारी पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे १६५० रुपयापर्यंतचा दंड ठोठावण्यात येत आहे.
यासोबतच दुसरी बाजू पाहता शहरात वाहन पार्किंगची समस्या ही नेहमीचीच झाली आहे. संपूर्ण शहरातील अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत असल्यामुळे रुंदीकरणाचे काम करण्यात आले आहे. परंतु या रुंदीकरणाचा वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यात कोणताच उपयोग झाला नाही.
अनेक रस्त्यांवरील वाहतूक कोंडी ही ‘जैसे थे’ याच परिस्थितीत आहे. एकीकडे खराब रस्ते, खड्डे, पार्किंगची समस्या तर दुसरीकडे वाहतूक पोलिसांच्यावतीने करण्यात येणारी कारवाई, कधी हेल्मेटसक्ती तर कधी नो पार्किंग मधील कारवाई या दोन्ही गोष्टींमुळे जनता आणि रहदारी पोलीस यांच्यात वारंवार वादावादी होण्याचेही प्रमाण वाढले आहे.