ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या मराठी भाषिकांना कन्नड भाषेतील अर्ज घेण्याची सक्ती करणाऱ्या अधिकाऱ्याला जि. पं. सदस्य सुनील अष्टेकर यांनी चांगलेच धारेवर धरून जाब विचारल्याची आणि संबंधितांना मराठी भाषेतील अर्ज मिळवून दिल्याची घटना आज सकाळी मुतगा ग्रामपंचायतीमध्ये घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी कांही इच्छुक उमेदवार अर्ज घेण्यासाठी मुतगा ग्रा. पं. कार्यालयात गेले होते. त्यावेळी तेथील अधिकाऱ्यांनी त्यांना कन्नड भाषेतील उमेदवारी अर्ज देऊन ते भरण्यास सांगितले. या प्रकाराला तेथे उपस्थित असलेले जि. पं. सदस्य सुनील अष्टेकर यांनी तीव्र आक्षेप घेऊन मराठी भाषेतील अर्ज देण्याची विनंती केली. त्यावेळी अधिकाऱ्याने मराठी भाषेतील अर्ज मिळणार नाहीत असे अप्रत्यक्षरीत्या सांगून कन्नड भाषेतच उमेदवारी अर्ज भरावा लागेल असे सांगितले.
तेंव्हा मराठी भाषेतील अर्ज काम मिळणार नाहीत? असाच जाब विचारून अष्टेकर यांनी अधिकाऱ्याला चांगलेच धारेवर धरले. अल्पसंख्यांक मराठी भाषिकांना त्यांच्या मातृभाषेतील अर्ज अथवा अन्य कागदपत्रे दिली जावीत, असे कायद्याने सांगितलेले आहे. जिल्हाधिकाऱ्यांची देखील याला मान्यता आहे असे सांगून उमेदवारी अर्ज कन्नड मध्येच भरले पाहिजेत असा कोणता आदेश तुमच्याकडे आहे का? असा सवाल सुनील अष्टेकर यांनी केला.
त्यावेळी निरुत्तर झालेल्या संबंधित अधिकाऱ्याने निमुटपणे मराठी भाषेत उपलब्ध असलेला उमेदवारी अर्ज काढून तर दिला परंतु उमेदवारी अर्जांची ऑनलाइन कन्नडमध्ये नोंदणी होत असल्यामुळे मराठी अर्ज पाहून कन्नड अर्जच भरावा लागेल असे सांगितले.
यासंदर्भात सुनील अष्टेकर यांनी तहसीलदारांची भेट घेऊन घडला प्रकार त्यांच्या कानावर घातला. तसेच मराठीतील उमेदवारी अर्ज ऑनलाइन कन्नड भाषेत भरण्याची समस्या तुमची आहे. तुम्ही ती सोडवले पाहिजे हवे तर मराठी भाषेतील अर्ज ऑनलाईन भरताना मी स्वखर्चाने तुम्हाला दुभाषी उपलब्ध करून देतो असे अष्टेकर यांनी सांगितले.
तेंव्हा तहसीलदारांनी मराठी भाषेतील उमेदवारी अर्ज भरण्यास कोणतीही हरकत नसल्याचे स्पष्टीकरण दिले. मराठी भाषेतील उमेदवारी अर्जासंदर्भात जि. पं. सदस्य सुनील अष्टेकर यांनी घेतलेल्या उपरोक्त भूमिकेची इच्छुक मराठीभाषिक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांमध्ये प्रशंसा होत आहे.