चिदंबरनगर येथील सुमारे 70 वर्षे जुने दोन वृक्ष तोडण्याच्या कृतीचा तीव्र निषेध करून यापुढे वृक्षांना वाचविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. तसेच वृक्ष तोडीचे प्रकार निदर्शनास येताच नागरिकांनी तात्काळ आपल्याला कळवावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते व निसर्गप्रेमी दीपक अवर्सेकर यांनी केले आहे.
चिदंबरनगर येथे काल दोन मोठ्या वृक्षांची कत्तल करण्यात आली. या घटनेचा दीपक अवर्सेकर व इतर निसर्गप्रेमींनी तीव्र निषेध केला आहे. तसेच आज अवर्सेकर यांच्या नेतृत्वाखाली अविनाश वेलंगी, संगम कक्केरी, श्रीमती सुनिता पाटणकर आदी निसर्गप्रेमींनी वृक्षतोड रोखण्यासाठी चिदंबरनगर परिसरात पाहणी दौरा केला.
त्याचप्रमाणे काल जेथील वृक्ष सोडण्यात आले त्या ठिकाणी भेट दिली. महापालिका आयुक्त शशिधर कुरेर यांनी यापूर्वीच शहरातील झाडे न सोडता त्यांचे संरक्षण केले जाईल, असे आश्वासन दिले आहे. तथापि अद्याप वृक्षतोड सुरूच असून त्याचा आम्ही निषेध करतो. तसेच यापुढे वृक्षांची कत्तल खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा दीपक अवर्सेकर यांनी यावेळी दिला.
आपल्या पाहणी दौऱ्यादरम्यान अवर्सेकर व इतरांनी चिदंबरनगर येथील स्थानिक नागरिकांमध्ये वृक्षतोडी संदर्भात जनजागृती केली. तसेच शहर उपनगरात वृक्षतोडीचा प्रकार निदर्शनास येताच नागरिकांनी आपल्याला तात्काळ 9845143111या मोबाईल क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन दीपक अवर्सेकर यांनी केले.
दरम्यान, वृक्षांची कत्तल करण्याचे हे प्रकार आपण वनखात्याचे डीसीएफ अमरनाथ, बसवराज पाटील आणि आरएफओ विनय अगोदर यांच्या निदर्शनास आणून दिले आहेत. तसेच त्यांनी वृक्षतोड करणार्यावर कडक कारवाई करण्याचे आश्वासनही दिले असल्याचे दीपक अवर्सेकर यांनी सांगितले.