स्टार एअर कंपनीच्या बेळगांव येथील ताफ्यात आणखीन एक विमान आल्यामुळे महाराष्ट्रातील नाशिक व राजस्थानमधील जोधपूर शहराला विमान सुरू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. स्टार एअरने या दोन्ही शहरांना विमानसेवा सुरू करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केल्याची माहिती उपलब्ध झाली असून या सेवा सुरू झाल्यास बेळगांव हे 12 शहरांना थेट विमान सेवेद्वारे जोडले जाणार आहे.
बेंगलोर व सुरत या शहरांना विमानसेवा सुरू करणाऱ्या स्टार एअरने आता नाशिक व जोधपुर शहरांना विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. स्टार एअरला हे दोन्ही मार्ग उडाण -3 योजनेअंतर्गत मंजूर झाले होते. लवकरच या शहरांना बेळगांवमधून विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. स्टार एअरने यापूर्वी बेळगांवमधून मुंबई, इंदूर,अहमदाबाद सुरत, बेंगलोर व अजमेर या शहरांना विमानसेवा सुरू केली होती.
स्टार एअरच्या ताफ्यात आणखी एक विमान दाखल झाल्यामुळे बेळगांव विमानतळावर दोन विमानांचे नाईट पार्किंग केले जात आहे. बेळगांव विमानतळावरून प्रवास करणार्या प्रवाशांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे नव्या शहरांना विमान सेवेने जोडले जात आहे. याचा फायदा बेळगांव शहराच्या विकासासाठी होताना दिसत आहे.
सर्वसामान्यांना विमान प्रवास करता यावा यासाठी केंद्र सरकारने उडान योजना अंमलात आणली. या योजनेमुळे कमी तिकीट दरात प्रवाशांना विमान प्रवास करता येत आहे. टू व थ्री टायर शहरांना जोडण्यासाठी या योजनेतून प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे बेळगांवला आतापर्यंत 10 शहरांना विमान सेवेद्वारे जोडण्यात आले आहे. उडान -3 अंतर्गत स्टारला बेळगांवमधून जयपूर, जोधपूर, नागपूर, नाशिक व तिरुपती असे मार्ग मंजूर झाले आहेत.