बेळगाव हे मराठी साहित्यासाठी ठळकपणे घेतलं जाणार नाव आहे.मराठीतील पहिली कादंबरी लिहिणारे बाबा पद्मनजी व मराठीतील पहिली ऐतिहासिक कादंबरी लिहिणारे रा.भी गुंजीकर हे देखील बेळगावचेच..इंदिरा संत,कृ ब निकुंभ,शंकर रामानी अशी थोर परंपरा बेळगावला लाभलेली आहे.बेळगाव परिसरात अनेक मराठी साहित्य संमेलनांचे आयोजन केले जाते हा मराठीचा धगधगता यज्ञ कुंड सतत जागता ठेवण्याचे काम ज्या धुरीनानी केले त्यात अशोक याळगी हे नांव अग्रस्थानी येते.
याळगी ‘बाबा’ या नावाने साहित्यविश्वात परिचित होते. काल पर्यंत लोकमान्य ग्रंथालयाच्या कामात सक्रिय भाग घेणारे बाबा आज हे पुस्तकांचे जग पाठीमागे ठेऊन निघून गेले., यावर विश्वास ठेवणे कठीण जात आहे.मराठी साहित्यिकांचा इतिहास विचारायचा असेल तर याळगी बाबां एवढं अधिकाराचं नाव बेळगावात दुसरं मिळणार नव्हतं.लोकमान्य ग्रंथालयाची जबाबदारी सांभाळताना एखाद्या वाचकांने ठरावीक पुस्तक मागितलं तर ते मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेली धडपड पाहिली तर वाचक लेखक चळवळीसाठी त्यांनी दिलेले योगदान सहज लक्षात येते.महाराष्ट्रभरच्या साहित्यिकात त्यांचा असलेला दबदबा हा त्यांच्या जाणकार साहित्याच्या नजरेचा होता.
दैनिक तरुण भारतच्या दिवाळी अंकाचे अनेक वर्षे त्यांनी संपादन केले त्यावेळी त्यांनी स्वीकारलेले आणि साभार परत पाठवलेल्या साहित्य कृतीबाबत आक्षेप घेण्याची कोणत्याही साहित्यिकात धमक नव्हती.बाबांनी अनेक नवोदित लेखकांच्या पाठीवर हात ठेवत त्यांना लिहीतं केलं, त्यांना व्यासपीठ दिलं.
बुक लवर्स क्लबच्या माध्यमातून बेळगावात साहित्य चळवळ उभा कऱण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. तीन वर्षात 500 वक्ते बुक लव्हर्सच्या व्यासपीठावरुन बोलून गेले यातच त्यांच्या कार्याची व्याप्ती समजते.वाङ्मय चर्चा मंडळ,सरस्वती वाचनालय,लोकमान्य ग्रंथालय आणि अनेक साहित्य संमेलने यांच्याशी ते निगडित होते.विद्यार्थी दशेपासून सीमा चळवळीत त्यांचा सहभाग होता बेधडक आणि कुणाचा मुलाहिजा न बाळगणारी लेखनी या जोरावर त्यांनी पत्रकारितेत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं होतं.सीमा लढ्याचा जीताजागता इतिहास माहीत असणारा एकमेव व्यक्ती अशी त्यांची ख्याती होती.बेळगाव सीमा प्रश्नासाठी त्यांनी तुरुंगवास देखील भोगला होता.सीमा लढ्यातील सहभागाचा परिणाम म्हणून काही काळ त्यांना कोल्हापूरला शिक्षणासाठी जावं लागलं होतं कोल्हापूर येथील गोखले कॉलेजचे ते विद्यार्थी होते.
महाराष्ट्रातील दिग्गज साहित्त्यिकांशी त्यांचे संबध होते मराठी साहित्याला बेळगाव आणि महाराष्ट्राशी जोडून ठेवण्यात त्यांचे योगदान महत्वाचं होतं .बेळगावातील अनेक मराठी पत्रकारांना त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. बेळगावातील मराठी पत्रकारितेतील या अवलीयास टीम बेळगाव Live कडून भावपूर्ण आदरांजली…