Tuesday, January 28, 2025

/

‘बंद’ आणि बैठकीवर व्यक्त झाले सवदी आणि बोम्मई

 belgaum

बेळगावमध्ये सुरु असलेल्या भाजपच्या कोअर कमिटी बैठकीत अनेक नेतेमंडळी सहभागी झाली आहेत. त्याचप्रमाणे मराठा विकास महामंडळाच्या विरोधात कन्नड संघटनांनी आज कर्नाटक बंद पुकारला आहे. यावर आज उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आणि गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी आपलाही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गांधी भवन येथे सुरु असलेल्या बैठकीदरम्यान पत्रकारांशी संवाद साधत त्यांनी आपली मते मांडली आहेत.

बेळगावमध्ये सुरु असलेल्या कार्यकारिणी बैठकीत प्रामुख्याने गोहत्या प्रतिबंधक कायदा, लव्ह जिहाद या गोष्टींवर चर्चा करण्यात आली असून येत्या अधिवेशनात याबाबत ठराव मांडण्यात येण्याची शक्यता असल्याचे मत लक्ष्मण सवदी यांनी व्यक्त केले. कर्नाटक बंद बाबत बोलताना ते म्हणाले कि, काही कन्नड संघटनांच्यावतीने समाजातील शांतता बिघडविण्याचे कारस्थान चालविले जात आहे. काही संघटनांनी पुकारलेल्या बंद ला जनतेने कोणत्याही पद्धतीचा प्रतिसाद दिला नाही. मराठा आणि मराठी यातील फरक या संघटनांना समजला नसून नाहक जनतेला वेठीस धरण्याचे कार्य या संघटनांच्या माध्यमातून करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांसमोर मांडली.

यासोबतच या बैठकीला उपस्थित असलेले गृहमंत्री बसवराज बोम्मई प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले कि, कर्नाटक बंदला जनतेने सहकार्य दिले नाही. बेळगावसह, बंगळूर आणि संपूर्ण राज्यभरात नेहमीप्रमाणे व्यवहार सुरळीतपणे सुरु आहेत. दैनंदिन व्यवहार, नागरिकांची वर्दळ, वाहनांची रहदारी, बससेवा तसेच संपूर्ण बाजारपेठ नेहमीप्रमाणेच सुरु आहे. जाणीवपूर्वक ज्यांनी हा बंद पुकारला आहे, त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. जनता आता जागरूक झाली आहे. या बंदला कोणत्याही पद्धतीचा प्रतिसाद न देता आज जनतेने घेतलेली भूमिका योग्य असून त्यांचे अभिनंदन करतो, असे मत बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केले.Savadi

 belgaum

राज्यात काही ठिकाणी या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाबाबतीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत असून याबाबतीत योग्य ती खबरदारी घेण्यासाठी सूचना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

राज्यात अंमली पदार्थ प्रकरणाबाबत संबंधितांवर चार्जशीट दाखल करण्यात आल्याचेही ते म्हणाले. बेळगावमध्ये सुरु असलेल्या भाजप कार्यकारिणीच्या बैठकीबाबत बोलताना ते म्हणाले, २०१२ मध्ये गोहत्या कायदा अंमलात आणण्यासाठी राज्यपालांनी विरोध दर्शविला होता.

परंतु हा कायदा अस्तित्वात येणे अत्यावश्यक आहे. बेळगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत गोहत्या, लव्ह जिहाद, आणि इतर महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली असून आगामी अधिवेशनात गोहत्या कायद्याबाबत ठराव मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.