अनगोळ येथील स्वच्छता कंत्राटदार नागेश गोरल यांच्यामार्फत एका प्रामाणिक स्वच्छता कर्मचाऱ्यावर अन्याय झाल्याप्रकरणी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी आवाज उठविला आहे. यासंदर्भात यापूर्वीच प्रादेशिक आयुक्त, उपयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांची भेट घेऊन माहिती दिली आहे.
संबंधित कंत्राटदाराने या स्वछता कर्मचाऱ्याचा छळ करून त्याला कामावरून कमी केले आहे. या कंत्राटदारावर कारवाई करण्यासाठी आज विनायक गुंजटकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे.
राजू कोल्हार असे या स्वच्छता कर्मचाऱ्याचे नाव असून लॉकडाऊनच्या आधीपासून आणि लॉकडाऊनच्या काळात या कर्मचाऱ्याने अत्यंत प्रामाणिकपणे आपले कार्य केले आहे. गेल्या १२ वर्षांपासून राजू कोल्हार हा या कामावर असून लॉकडाऊन काळात याने आपल्या जीवाची पर्वा न करता स्वच्छतेचे काम केले आहे.
परंतु राजू कोल्हापूरप्रमाणेच इतर कर्मचाऱ्यांवर दबाव आणून कंत्राटदार कामावरून कमी करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कंत्राटदाराने दिलेल्या आदेशाप्रमाणे काम न केल्यास तातडीने त्याला कामावरून कमी करण्याचा प्रकार सुरु आहे.
लॉकडाऊनच्या काळात प्रत्येक स्वच्छता कर्मचाऱ्याने प्रामाणिकपणे कार्य केले आहे. या कामात असणारे बहुतेकजण हे आर्थिक परिस्थितीने बिकट आहेत. अशावेळी कंत्राटदाराचा आडमुठेपणा नादात असून या सर्वांवर अन्याय करण्यात येत आहे. यासंदर्भात संबंधित प्रशासनाने लक्ष पुरवून कंत्राटदारावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, आणि संबंधित कंत्राटदाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
शहराच्या स्वच्छतेसंबंधी पालिकेने अनेक योजना आखलेल्या आहेत. परंतु अनेक ठिकाणी स्वच्छता होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. यामुळे महानगरपालिका प्रशासनाने आणि संबंधित विभागाने पालिकेच्यावतीने देण्यात आलेल्या कंत्राटदारांची चौकशी करावी, तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सेवा पुरवावी, अशीही मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.