राष्ट्रध्वजाचा आणि राष्ट्रगीताचा अपमान करून महापालिकेसमोर अनधिकृत रित्या फडकविण्यात आलेला लाल पिवळा ध्वज हटवावा या मागणीचे निवेदन देण्यासाठी गेलेल्या म. ए. समिती आणि युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अडकाठी केल्यामुळे एकच शाब्दिक संघर्ष उडाल्याची घटना सकाळी घडली.
बेळगांव महापालिका कार्यालयासमोर काल सोमवारी कांही कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी थयथयाट करून अनधिकृतरित्या लाल पिवळा फडकविला. पोलिसांनाही भिक न घालता संबंधित कार्यकर्त्यांनी यावेळी महापालिका आवारातील राष्ट्रध्वजाचा तर अपमान केलाच शिवाय बेशिस्तपणे राष्ट्रगीताचे गायन करून राष्ट्रगीताचा अपमानही केला.
त्याच्या निषेधार्थ आणि संबंधित अनधिकृत ध्वज हटवावा या मागणीसाठी पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यास गेलेल्या म. ए. समिती आणि युवा समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आज मंगळवारी सकाळी पोलिसांनी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर अडविले. तसेच साहेब कामात आहे तुम्हाला आता निवेदन देता येणार नाही, असे सांगून पोलिसांनी सर्वांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. तथापि तिथून न हटता समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करून जोरदार निदर्शने केली. तसेच आम्ही लोकशाही मार्गाने शांततेत निवेदन सादर करण्यास आलो आहोत किंवा कृपया आम्हाला निवेदन देण्यात आज सोडावे अशी मागणी समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली.
यावरून पोलीस उपायुक्त नीलगार आणि समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक संघर्ष झाला. यावेळी आम्हाला तुमचे ऐकण्यासाठी येथे ठेवलेले नाही, असे सांगून निलगार यांनी मज्जाव केला. तेंव्हा बामणे शेळके यांनी पोलीस आज आमच्या बाबतीत जो आक्रमकपणा दाखवत आहेत तो काल त्या अनाधिकृत ध्वजारोहण याप्रसंगी कुठे गेला होता? असा सवाल केला. तेंव्हा उपस्थित पोलीस अधिकारी निरुत्तर झाल्याचे पहावयास मिळाले. माजी महापौर सरिता पाटील आणि उपमहापौर रेणू किल्लेकर यांनी आपल्याला विनाकारण अर्धा-पाऊण तास अडवून ताटकळत ठेवल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून आपली बाजू मांडली. आम्ही शांततेत निवेदन देण्यास आलो आहोत. तेंव्हा आम्हाला निवेदन दिले जाऊदे. आम्ही काय साहेबांवर हल्ला करण्यात आलेलो नाही. तेंव्हा कृपया आम्हाला पोलीस आयुक्तांना भेटण्यास द्यावे, अशी विनंती युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके व उपमहापौर रेणू किल्लेकर यांनी केली.
समिती व युवा समितीचे पदाधिकारी आणि आणि पोलीस अधिकाऱ्यांमधील या संघर्षाची माहिती मिळताच एसीपी नारायण बरमनी हे तात्काळ घटनास्थळी धावून आले. बरमनी यांनी यशस्वी मध्यस्थी करताना समितीचे निवडक चार-पाच पदाधिकारी साहेबांना भेटू शकतात, बाकीच्यांनी मात्र बाहेरच थांबावे असे सांगितले.
एसीपी बरमनी यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे सुरु असलेल्या संघर्षावर अखेर पडदा पडला. विशेष म्हणजे निवेदन सादर केल्यानंतर म. ए. समिती व युवा समितीच्या पदाधिकारी -कार्यकर्त्यांनी शिस्तबद्धरित्या राष्ट्रगीताचे गायन करून राष्ट्रगीत कसे म्हंटले पाहिजे हे दाखवून दिले.