रोजगार हमी योजनेअंतर्गत कामागारांना कामाच्या ठिकाणी उदभवणाऱ्या परिस्थितीवर मात करण्यासंदर्भातील मार्गदर्शनपर कार्यक्रम गोकाक तालुक्यातील अंकलगी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात नुकताच पार पडला.
सदर कार्यक्रमाप्रसंगी रोजगार हमी योजनेअंतर्गत कामागारांना कामाच्या ठिकाणी उदभवणाऱ्या परिस्थितीवर मात करण्यासंदर्भात जेष्ठ समाजसेवक शिवाजी कागणीकर व राहुल पाटील यांनी कामगारांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना शिवाजी कागणीकर यांनी उपस्थित कामगारांना रोजगार योजनेच्या कायद्याची व संघटनात्मक माहिती दिली. राहुल पाटील यांनी रोजगाराच्या कामावर येणाऱ्या अडचणीबाबत सर्वांशी चर्चा केली व कार्यालयीन कामांच्या अडचणीसंदर्भात संपर्कासाठी आवाहनही केले.
गेले महिनाभर सरकारच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत अंकलगी गांवातील कामगारांना रोजगाराचे काम न देता काहीतरी कारण सांगून ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांमार्फत चालढकल करण्यात येत होती. तेंव्हा तेथील महिलांनी भर उन्हात सुद्धा अडव्याप्पा कुंबरगी व कविता मुरकुटी यांच्या नेतृत्वाखाली पंचायतीपुढे आंदोलन केले होते. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन कामगारांना रोजगार हमी योजनेची कामे देण्यात आली परंतु पुन्हा काहीतरी कारण सांगून काम थांबविण्यात आले आहे. तेंव्हा गोकाक तालुक्यातील संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून लोकांना लवकर रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे अन्यथा परत आंदोलन छेडण्याचा येईल, असे राहुल पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. याप्रसंगी रोजगाराच्या कामावरील महिलांची व पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.